मुंबई पोलिसांनी ‘टॉरेस’ (Torres Company) या ज्वेलरी ब्रँडच्या नावाखाली पॉन्झी स्कीम-कम-एमएलएम स्टाइल गुंतवणूक फसवणूक करणाऱ्या आठ युक्रेनियन आणि तुर्की नागरिकांविरुद्ध इंटरपोलची ब्लू कॉर्नर नोटीस (Blue Corner Notice) जारी केली आहे. पोलिसांच्या तक्रारीनुसार, या प्रकरणात 1.25 लाख गुंतवणूकदारांनी जवळपास 1 हजार कोटींची फसवणूक झाली आहे. मुंबई पोलिसांच्या आर्थिक गुन्हे शाखेने (EOW) मंगळवारी इंटरपोलच्या माध्यमातून सीबीआयच्या मदतीने या वाँटेड परदेशी संशयितांविरुद्ध ब्लू कॉर्नर नोटीस जारी केली. एका अधिकाऱ्याने ‘द इंडियन एक्सप्रेस’ला ही माहिती दिली.
ब्लू कॉर्नर नोटीस हे इंटरपोलच्या सदस्य देशांमध्ये आणि कायदा अंमलबजावणी संस्थांमध्ये त्या व्यक्तीच्या ओळखी, स्थान किंवा क्रिमिनल तपासाच्या संदर्भात अधिक माहिती गोळा करण्यासाठी जारी केली जाते. एकदा आरोपपत्र दाखल झाल्यावर, त्या व्यक्तीविरुद्ध रेड कॉर्नर नोटीस जारी केली जाऊ शकते, असे दुसऱ्या एका अधिकाऱ्याने सांगितले.
पोलिसांनी ज्यांच्याबद्दल ब्लू कॉर्नर नोटीस जारी केला आहे, त्यात टॉरेस या ब्रँडचे संचालन करणाऱ्या प्लॅटिनम हर्न प्रायव्हेट लिमिटेडची संचालिका ओलेना स्टॉयन, विक्टोरिया कोव्हालेन्को, मुस्तफा कराकोच, ओलेक्जान्दर बोरोविक, ओलेक्जान्दर झॅपिचेंको, ओलेक्जान्द्रा ब्रंकीव्स्का, ओलेक्जान्द्रा ट्रेडोखिब, आर्तेम ओलिफेर्चुक आणि युर्चेंको इगोर यांचा समावेश आहे. मुस्तफा कराकोच हा तुर्की नागरिक आहे, तर बाकीचे सर्व युक्रेनी नागरिक आहेत, असे ईओडब्ल्यूच्या एका अधिकाऱ्याने सांगितले. हे सर्व वॉण्टेड आहेत.
आतापर्यंत या प्रकरणात कंपनीची जनरल मॅनेजर तानिया खसाटोवा (उझबेकिस्तान), संचालक सर्वेश अशोक सर्वे आणि स्टोअर इंचार्ज व्हॅलेन्टिना गणेश कुमार (रशियन मूळ) यांना अटक केली आहे. याशिवाय, ईओडब्ल्यूने कथित हवाला ऑपरेटर अल्पेश खारा यालाही अटक केली आहे. टोरेस फसवणुकीच्या युक्रेनियन मास्टरमाइंड्सनी परदेशात 200 कोटी रुपये पाठवल्याचा संशय आहे, हे प्रकरण लोकांसमोर येण्यापूर्वी कथित व्हिसलब्लोअर्सनी पोलीस आणि इतर कायदा अंमलबजावणी संस्थांना पाठवलेल्या ईमेलमध्ये हा दावा केला आहे. (हेही वाचा: Torres Company Scam: मुंबईत टॉरेस ज्वेलरी कंपनीद्वारे तब्बल 1.25 लाख गुंतवणूकदारांची 1,000 कोटींची फसवणूक; तीन जणांना अटक, सूत्रधार युक्रेनला पळाले, प्रकरण EOW कडे हस्तांतरित)
दरम्यान, कंपनीने लोकांना आठवड्याला 6 टक्क्यांपासून 10 टक्क्यांपर्यंत परतावा देण्याचे अमिष दाखवून लाखो रुपये गोळा केले. त्यानंतर गुंतवणूकदारांची फसवणूक करून कंपनी बंद केली. लोकांना डिसेंबरच्या अखेरीस व्याज पेमेंट मिळणे बंद झाल्यानंतर ही फसवणूक उघड झाली. त्यानंतर 6 जानेवारी रोजी, मुंबई, नवी मुंबई आणि मीरा रोड येथील हजारो गुंतवणूकदारांनी टोरेसच्या ज्वेलरी स्टोअर्सच्या बाहेर निदर्शने केली.