कोरोना विषाणू (Coronavirus) रुग्णांच्या बाबतील मुंबई, ठाणे नंतर पुण्याचा (Pune) नंबर लागतो. महाराष्ट्रातील कोरोनाचे नवे हॉटस्पॉट म्हणून पुण्याचे नाव घेतले जात आहे. अशात पुण्याचे महापौर मुरलीधर मोहोळ (Murlidhar Mohol) यांनी आरोप केला आहे की, शहरात कोरोना विषाणूमुळे झालेल्या जवळजवळ 400 रुग्णांच्या मृत्यूची कोणतीही नोंद नाही. गुरुवारी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (Chief Minister Uddhav Thackeray) हे पुणे शहरातील कोरोना विषाणूच्या परिस्थितीचा आढावा घेण्यासाठी आले असता, आपण हा मुद्दा उपस्थित केल्याचे मोहोळ यांनी सांगितले.
महापौरांनी शुक्रवारी सांगितले की, शहरातील ससून जनरल हॉस्पिटल (Sassoon General Hospital) व शहरातील इतर खासगी रुग्णालयात दरमहा किमान 400 ते 500 संशयित कोरोना विषाणूचे रुग्ण मरण पावत आहेत, ज्यांचा हिशेब ठेवला जात नाही. त्यांनी पुढे सांगितले, ससून रुग्णालयात कोरोना विषाणूच्या किमान 12 संशयित रुग्णांचा मृत्यू होत आहे. खासगी रुग्णालयांमध्येही अशीच प्रकरणे समोर येत आहेत. मोहोळ यांनी दावा केला की, या मृत्यूंचा लेखाजोखा ठेवला जात नाही, कारण या रूग्णांना एकतर मृत अवस्थेत रुग्णालयात आणले जाते किंवा तेथे पोचल्यानंतर लगेचच या रुग्णांचा मृत्यू होतो.
ते पुढे म्हणाले, मार्गदर्शक सूचनांनुसार मृत व्यक्तीची कोणतीही चौकशी केली जात नाही. परंतु जेव्हा डॉक्टर या लोकांचे एक्स-रे काढतात, तेव्हा या लोकांमध्ये कोविड-19 ची लक्षणे दिसून येतात. मोहोळ यांनी मुख्यमंत्र्यांसमोर हा मुद्दा उपस्थित करताना त्यांनी असे मृत्यू टाळण्यासाठी पावले उचलण्याची मागणी केली. मोहोळ म्हणाले, कोरोना व्हायरस रुग्णांना लवकर शोधून काढले पाहिजे जेणेकरून त्यांना वेळेवर उपचार मिळू शकतील आणि अशा मृत्यूंना रोखता येईल. (हेही वाचा: मुंबईमध्ये आज कोरोना विषाणूच्या 1,059 रुग्णांची नोंद; एकूण संक्रमितांची संख्या 1,15,346 वर)
या आरोपानंतर जिल्हाधिकारी नवल किशोर राम (Naval Kishore Ram) म्हणाले की, ‘या संदर्भात चौकशी केली जाईल आणि ससून रुग्णालयाकडून अहवाल मागविला गेला आहे. तसेच जिल्हा प्रशासन कर्मचारी ससून रूग्णालयात जाऊन नोंदी तपासतात. पुण्यात कोणतीही चुकीची माहिती किंवा कमी माहिती दिली जाण्याची शक्यता कमी आहे. डेटा एन्ट्रीशी संबंधित काही अडचणी असू शकतात. परंतु आदरणीय महापौरांनी उल्लेख केलेले आकडे अशक्य वाटत आहेत मात्र आम्ही वस्तुनिष्ठपणे चौकशी करू.’