धक्कादायक! सांताक्रूझ-चेंबूर, लिंक रोड येथील रेल्वे रुळांजवळ महिलेचं शिर सापडलं
Representational Image | (Photo Credits: ANI)

सांताक्रूझ-चेंबूर, लिंक रोड येथील रेल्वे रुळांजवळ महिलेचं शिर सापडलं आहे. मागील आठवड्यात विद्याविहारमध्ये शिर नसलेला मृतदेह आढळून आला होता. हे शिर त्या मृत महिलेचे असावे, असा प्राथमिक अंदाज पोलिसांकडून व्यक्त होत आहे.

मागच्या सोमवारी विद्याविहारमध्ये एका महिलेचा शिर नसलेला मृतदेह सापडला होता. त्यामुळे परिसरात एकच खळबळ उडाली होती. त्यानंतर नागरिकांनी याबाबत घाटकोपर पोलिसांना माहिती दिली होती. याठिकाणी एका बेडशीटमध्ये गुंडाळलेला मृतदेह सापडला होता. दरम्यान, आज लिंक रोड रेल्वे रुळाजवळ सापडलेले शिर याच महिलेचे असण्याची शक्यता पोलिसांकडून वर्तवण्यात येत आहे. (हेही वाचा - उल्हासनगर: चारित्र्याच्या संशयावरून पतीने पत्नीला पेटवलं; नराधम पती फरार)

विद्याविहार येथे सोमवारी एसटी डेपोजवळ बेडशीटमध्ये 30 ते 35 वयोगटांतील महिलेचे धड आढळून आले होते. या महिलेचे दोन्ही पाय आणि शिर शरीरापासून वेगळे करण्यात आले होते. या महिलेची हत्या करून मृतदेहाचे तुकडे करण्यात आल्याचा अंदाज पोलिसांकडून वर्तवण्यात येत आहे. या प्रकरणाचा अधिक तपास घाटकोपर पोलीस करत आहेत.