उल्हासनगर: चारित्र्याच्या संशयावरून पतीने पत्नीला पेटवलं; नराधम पती फरार
Husband Burns His Wife Representational images (PC - File Photo)

ठाणे जिल्ह्यातील उल्हासनगर (Ulhasnagar) शहरात चारित्र्याच्या संशयावरून पतीने पत्नीला पेटवल्याची धक्कादायक घटना घडली आहे. या घटनेमुळे पीडित महिला 75 टक्के भाजली असून तिच्यावर रुग्णालयात उपचार सुरू आहेत. हे कृत्य करणारा नराधम पती मात्र फरार झाला आहे. पोलिस या नराधमाचा तपास करत आहेत. आत्माराम पवार असं या नराधमाचं नाव आहे.

आत्माराम आणि सुमन पवार हे दोघे पती-पत्नी उल्हासनगर शहरातील विठ्ठलवाडी येथे राहतात. आत्माराम नेहमी पत्नी सुमनवर चारित्र्याचा संशय घेत असे. त्यामुळे या दोघांमध्ये सतत वाद होत होते. गुरुवारी रात्री सुमन स्वयंपाक बनवत होत्या. त्यावेळी आरोपी आत्माराम दारू पिऊन घरी आला होता. त्यानंतर त्याने चारित्र्याचा संशय घेत पत्नी सुमनसोबत भांडायला सुरुवात केली. हा वाद अगदी टोकाला गेला. त्यामुळे सुमनने आपल्या अंगावर रॉकेल ओतून घेतलं. त्यानंतर आत्मारामने सुमनच्या अंगावर काडीपेटीने काडी पेटवली.  (हेही वाचा - लोणावळा: चोरीच्या उद्देशाने घरात घुसलेल्या चोराकडून 70 वर्षीय वृद्ध महिलेची हत्या)

यात सुमन 75 टक्के भाजल्या. त्यानंतर सुमन यांना ठाण्यातील शासकीय रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आलं. सध्या सुमन यांची प्रकृती चिंताजनक आहे. आत्माराम आणि सुमन यांना 3 मुलं आहेत. हा प्रकार पाहिल्यानंतर या तिघांची एकच हंबरडा फोडला.