कोरोना विषाणूच्या (Coronavirus) पार्श्वभूमीवर गेल्या सात ते आठ महिन्यांपासून राज्यातील शाळा, महाविद्यालय आणि विद्यापीठे बंद ठेवण्यात आले होते. त्यानंतर कोरोना रुग्णांची संख्या लक्षा घेता राज्य सरकारने टप्याटप्याने शाळा सुरू केल्या. शाळा तसेच महाविद्यालयं सुरू झाल्यानंतर विद्यापीठं कधी सुरू होणार असा प्रश्न सर्वांना पडला होता. मात्र, आता यावर उच्च व तंत्र शिक्षणमंत्री उदय सामंत (Uday Samant) यांनी स्पष्टीकरण दिलं आहे. राज्यातील विद्यापीठे महाविद्यालय सुरू करण्याचा निर्णय अंतिम टप्यात आहे. SOP ठरवून टप्याटप्याने महाविद्यालय सुरू करण्यात येणार असल्याचं उदय सामंत यांनी म्हटलं आहे.
यासंदर्भात अधिक बोलताना उदय सामंत म्हणाले की, सोमवारी विद्यापीठ सुरू करण्यासंदर्भात राज्यातील विद्यापीठांच्या कुलगुरूंसोबत बैठक झाली. सर्व विद्यापीठचे कुलगुरू विद्यापीठ महाविद्यालय सुरू करण्याबाबत सकारात्मक आहेत. विद्यापीठं सुरू करण्यासाठी SOP तयार करण्याचे काम सुरू आहे, असंही सामंत यांनी सांगितलं. (वाचा - Mumbai Local च्या वेळेत सामान्य नागरिकांसाठी बदल होणार? पहा आरोग्यमंत्री राजेश टोपे यांची प्रतिक्रिया)
दरम्यान, कोरोना काळात अनेक विद्यापीठांचे वसतीगृह क्वॉरंटाईन सेंटर म्हणून वापरण्यात येत होते. अजूनही याठिकाणी वसतीगृहात कोरोना रुग्ण आहेत. त्यामुळे हे वसतीगृह योग्यरित्या सॅनिटाइज करून त्यानंतर सुरू करण्यात येतील. पुढील दोन दिवसांत कॉलेज सुरू करण्यासंदर्भात तारीख जाहीर करू, असंही उदय सामंत यांनी यावेळी सांगितलं.
कोरोना विषाणूच्या वाढत्या प्रादुर्भावाला रोखण्यासाठी सरकारने देशातील सर्व शाळा बंद ठेवण्याचा निर्णय घेतला होता. परंतु, सध्याची स्थिती लक्षात घेता सरकारने काही राज्यांमध्ये पहिली ते दहावीपर्यंतचे सर्व वर्ग सुरू करण्यास परवानगी दिली. याअगोदर दहावी ते बारावीची शाळा सुरु करण्यास सरकारने परवानगी दिली होती. सोमवारी म्हणजेचं 1 फेब्रुवारीपासून महाराष्ट्र, आंध्र प्रदेश, हरियाणा, गुजरात, पंजाबमध्ये 1 ली ते 10 वी पर्यंतचे सर्व वर्ग सुरू करण्यात आले आहेत.