सरकारकडून शहीद जवानाच्या कुटुंबाची क्रूर चेष्टा; मदत म्हणून दिला खात्यात पैसे नसलेला चेक
शहीद जवान नितीन राठोड (Photo Credit : Facebook)

पुलवामा (Pulwama) येथे झालेल्या हल्ल्यात महाराष्ट्राचे दोन जवान शहीद झाले, या दोघांच्या कुटुंबांना राज्य सरकारने 50-50 लाखांची मदत जाहीर केली. जवानांच्या अंत्यसंस्कारावेळी हे चेक त्यांच्या कुटुंबाला देण्यात आले. यामध्ये आई, वडील यांना 20-20 टक्के आणि पत्नीला 60 टक्के असे शासकीय मदतीचे स्वरूप होते. सरकारच्या या गोष्टीचे बरेच कौतुकही झाले. मात्र आता लोणार तालुक्यातील चोरपांगरा येथील शहीद जवान नितीन राठोड यांच्या कुटुंबीयांना सरकारने चक्क बँकेत पैसे नसलेला चेक दिल्याची धक्कादायक बाब समोर येत आहे. त्यामुळे देण्यात आलेला चेक सरकारने परत घेतला आहे. फक्त दिखाव्यासाठी, फोटोसाठी सरकारने शहीद जवानाच्या कुटुंबाची क्रूर चेष्टा केल्याचे बोलले जात आहे.

16 फेब्रुवारीला शहीद जवानांवर अंत्यसंस्कार झाले. यावेळी कामगारमंत्री संभाजी पाटील निलंगेकर (Sambhaji Patil Nilangekar)यांनी शहीद जवान नितीन राठोड यांच्या कुटुंबीयांना मदतीचा चेक दिला. मात्र खात्यात पैसे नसलेला हा चेक असल्याने फोटो काढून झाल्यावर तो ताबडतोब परत घेण्यात आला. याबाबत कोणतेही कारण देण्यात आले नाही. नंतर चौकशी केली असता, हा चेक बँकेत भरला असता तर बाऊन्स झाला असता, हे आधीच माहित असल्याने हा चेक परत घेतला आल्याची धक्कादायक माहिती मिळाली. (हेही वाचा : पुलवामा दहशतवादी हल्ल्यातील शहीद जवानांच्या कुटुंबियांना CREDAI राहत्या शहरात देणार 2BHK फ्लॅट्स)

अंत्यसंस्कारच्या दिवशी शासकीय मदतीचा चेक मंत्री महोदयांच्या हस्ते देण्यात यावा म्हणून हा पैसे नसलेला चेक देण्यात आला. त्यानंतर बुलडाणा जिल्ह्याचे पालकमंत्री मदन येरावार यांनी परत दुसरा चेक राठोड कुटुंबियांना दिला, व लवकरच पैसे त्यांच्या खात्यात जमा होतील असे सांगितले. 14 फेब्रुवारीला पुलवामा येथे भारतीय लष्करावर हल्ला झाला, यामध्ये 40 पेक्षा जास्त जवान शहीद झाले, हा हल्ला लष्करावर झालेला सर्वात मोठा हल्ला सांगितला गेला.