नंदूरबार (Nandurbar) जिल्ह्यात आज होळीच्या सणावर विरजण पडलं आहे. उच्छल येथे तापी नदीच्या (Tapi River) बॅक वॉटरमध्ये (Back Water) बोट उलटल्याने 13 जण बुडाल्याची घटना घडली आहे. यातील तिघांचा मृत्यू झाला असून 4 जण बेपत्ता आहेत. यातील 6 जणांना वाचवण्यात यश आलं आहे. ही घटना महाराष्ट्र-गुजरात सीमावर्ती भागातील नवापूर परिसरात घडली. या घटनेमुळे संपूर्ण परिसरात खळबळ उडाली आहे.
गुजरातच्या उच्छल तालुक्यातील सुंदरपूर येथील एक कुटुंब सहलीसाठी आले होते. या कुटुंबियांनी उकाई धरणात बोटींग करण्यासाठी भाड्याने बोट घेतली होती. मात्र, बोटींग करत असताना भिंतखुद गावाजवळ वेगाने वारा आला. त्यामुळे बोट अनियंत्रित झाली आणि हा अपघात झाला. (हेही वाचा - धुळवडी निमित्त खासदार नवनीत राणा यांचं आदिवासी महिलांसोबत पारंपरिक नृत्य; पहा व्हिडिओ)
या घटनेची माहिती मिळताचं बचाव कार्याला सुरुवात करण्यात आली. स्थानिक ग्रामस्थ आणि मासेमारी करणाऱ्या लोकांनी 6 जणांचे प्राण वाचवले आहेत. या घटनेत एका मुलीचाही मृत्यू झाला आहे. तसेच 6 जण बेपत्ता झाले आहेत. आज दुपारच्या सुमारास तापी नदीच्या उकाई धरणातील बॅक वॉटरमध्ये भिंतखूद गावाजवळ ही घटना घडली आहे.
आज राज्यभरात धुळवडीचा उत्साह पाहायला मिळत आहे. मात्र, आज अनेकांचा पाण्यात बुडून मृत्यू झाला आहे. त्यामुळे होळी सणाला गालबोट लागलं आहे. चंद्रपूर जिल्ह्यात 2 जणांचा वेगवेगळ्या घटनांमध्ये पाण्यात बुडून मृत्यू झाला आहे. तसेच हिंगोलीतदेखील मित्राकडे रंगपंचमी खेळण्यासाठी आलेल्या 2 तरुणांचा शेत तळ्यात बुडून मृत्यू झाल्याची घटना घडली आहे.