Thane: 19 वर्षीय गर्भवती युवतीची आत्महत्या; प्रियकराविरुद्ध गुन्हा दाखल
Hanging | Representational Image | (Photo Credits: Pixabay)

प्रेयसीला आत्महत्येस प्रवृत्त केल्याप्रकरणी प्रियकरावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ठाणे (Thane) जिल्ह्यातून ही घटना समोर येत आहे. बदलापूर (Badlapur) पोलिस ठाण्यातील एका अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार, अंबरनाथ (Ambernath) येथे राहणाऱ्या एका 19 वर्षीय मुलीने राहत्या घरी गळफास घेऊन आत्महत्या केली. त्यानंतर तिच्या वडीलांनी मंगळवारी (20 ऑक्टोबर) पोलिसांत तक्रार दाखल केली. दरम्यान, पोस्टमार्टम रिपोर्टमधून ती मुलगी गर्भवती असल्याचे समोर आले आहे.

आत्महत्येनंतर मुलीचा फोन तपासण्यात आला. त्यात तिने 'आज मी तुझा सर्व त्रास संपवत आहे,' असा मेसेज आत्महत्येपूर्वी आरोपीला पाठवला असल्याचे निर्दशनास आले. त्यावरुन त्या दोघांमध्ये प्रेमसंबंध असल्याचे स्पष्ट होते. अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार, फोनमध्ये आरोपीचा एक फोटोही सापडला आहे. मंगळवारी तक्रार दाखल केल्यानंतर कलम 306 अंतर्गत आरोपीवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. दरम्यान, या प्रकरणी पोलिस अधिक तपास करत असून अद्याप कोणालाही अटक करण्यात आलेली नाही. (Pune Suicide: लग्नाला नकार दिला म्हणून एका विवाहित महिलेची गळफास लावून आत्महत्या; प्रियकरावर गुन्हा दाखल)

यापूर्वी लग्नाला नकार दिल्याने एका महिलेने आत्महत्या केल्याची घटना पुण्यातून समोर आली होती. प्रेमात धोका मिळाल्याने 28 वर्षीय महिलेने बायफ्रेंडला मेसेज करत आत्महत्या केली. संबंधित महिला घटस्फोटित होती. लग्नाच्या पाच वर्षांनंतर पती सोबत पटत नसल्याने तिने घटस्फोट घेतला होता. त्यानंतर दुसऱ्या तरुणाशी तिचे प्रेमसंबंध जुळले होते. परंतु, त्याने लग्नास नकार दिल्याचे दु:ख पचवू न शकलेल्या महिलेने आत्महत्येचे पाऊल उचलले. (Suicide: लॉकडाऊनमुळे कामधंदा नसल्याने ठाण्यात एका व्यक्तीची गळफास लावून आत्महत्या)

दरम्यान, कोरोना व्हायरस संकटात आत्महत्याचे अनेक घटना समोर आल्या. व्यवसाय, उद्योग बंद असल्याने निर्माण झालेला आर्थिक प्रश्न, बेरोजगारी, ऑनलाईन शिक्षणासाठी उपलब्ध नसलेली सुविधा, कोविड-19 ची भीती आणि एकंदर नकारात्मक वातावरण यामुळे आत्महत्या केल्याच्या घटना देशाच्या विविध भागातून समोर आल्या. त्याचबरोबर महिलांवरील अत्याचार, लैंगिक शोषण या घटनांचे प्रमाणही वाढल्याचे दिसून आले.