Suicide: लॉकडाऊनमुळे कामधंदा नसल्याने ठाण्यात एका व्यक्तीची गळफास लावून आत्महत्या
Hanging | Representational Image | (Photo Credits: Pixabay)

कोरोनाने संपूर्ण देशाला हादरून सोडले आहे. कोरोनाच्या वाढत्या प्रादुर्भावामुळे देशात लॉकडाऊन घोषीत करण्यात आला आहे. परिणामी, अनेक उद्योगधंदे, व्यवसाय आणि वाहतूकीसह बऱ्याच गोष्टी बंद झाल्या आहेत. दरम्यान, हातावर पोट असणाऱ्या नागरिकांना आर्थिक अडचणींना सामोरे जावा लागत आहे. यात लॉकडाऊनमुळे कामधंदा नसल्याने एका व्यक्तीने आत्महत्या केल्याची माहिती समोर आली आहे. ठाणे (Thane) जिल्ह्यातील वाघबीळ गावात ही घटना घडली आहे. याप्रकरणी स्थानिक पोलिसांनी आकस्मिक मृत्यूची नोंद केली आहे. या घटनेने आजूबाजुच्या परिसरात चिंताजनक वातावरण निर्माण झाली आहे.

रामेश्वर मनोहर दातार असे आत्महत्या केलेल्या बिगारी कामगाचे नाव आहे. रामेश्वर हा आपल्या पत्नीसह ठाणे जिल्ह्यातील वाघबीळ गावात राहत होते. रामेश्वर यांची पत्नी घरकाम करते तर, त्यांची एक मुलगी गावीच असते. मात्र, लॉकडाऊनमुळे त्यांना कामधंदा नसल्यामुळे गेल्या काही दिवसांपासून नैराश्यात होते. पत्नी घरकामासाठी बाहेर गेल्यानंतर रामेश्वर यांनी आपल्या राहत्या घरी गळफास लावून आत्महत्या केली आहे. याबाबत मृताच्या मेव्हण्यानेच कासारवडवली पोलिसांना माहिती दिली आहे. आत्महत्येने नेमके कारण अद्याप समजू शकलेले नाही. परंतु, बेरोजगारीमुळेच मृताने आत्महत्येसारखे टोकाचे पाऊल उचल्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. हे देखील वाचा-Bihar Gangrape: धक्कादायक! बॅंकेत जात असताना एका विवाहित महिलेवर सामूहिक बलात्कार; बिहारमधील बक्सर येथील घटना

 कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव पाहता भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी 24 मार्च 2020 रोजी संपूर्ण देशात लॉकडाऊन घोषीत केला होता. यामुळे गेल्या पाच ते सहा महिन्यांपासून बेरोजगारीच्या प्रमाणात वाढ झाल्याचे पाहायला मिळत आहे. मात्र, देशात गेल्या काही महिन्यांपासून अनलॉकला सुरुवात झाली असून टप्प्याटप्प्याने अनेक निर्बंधांना शिथिलता देण्यात आली आहे.