Tata Marathon | X

मुंबई मध्ये 19 जानेवारीला Tata Mumbai Marathon 2025 होणार आहे. त्यासाठी मध्य रेल्वेकडून विशेष ट्रेन्सची घोषणा करण्यात आली आहे. मॅरेथॉन साठी कल्याण वरून मध्य रेल्वे पहिली ट्रेन सकाळी 3 वाजता सुटणार आहे. ती ट्रेन सीएसएमटी स्थानकामध्ये 4.30 वाजता पोहचणार आहे. दुसरी स्पेशल ट्रेन पनवेल मधून 3.10 ला सुटणार आहे ती ट्रेन सीएसएमटी स्थानकामध्ये 4.30 वाजता पोहचणार आहे.

मध्य रेल्वे कडून चालवल्या जाणार्‍या मेन लाईन आणि हार्बर लाईन वर सार्‍या स्थानकांवर थांबणार आहे. टाटा मुंबई मॅरेथॉन ही शहरातील सर्वात प्रतिष्ठित स्पर्धांपैकी एक आहे. यामध्ये हजारो जण सहभागी होतात. एका अधिकाऱ्याने सांगितले की, "मध्य रेल्वेच्या या उपक्रमामुळे विशेषत: उपनगरातून पहाटे प्रवास करणाऱ्यांसाठी महत्त्वपूर्ण वाहतूक सहाय्य मिळणार आहे."

मध्य रेल्वेच्या ट्रेन प्रमाणे जादा बस सोडणार

बेस्ट कडूनही टाटा मुंबई मॅरेथॉन साठी विशेष बस सेवा सज्ज ठेवण्यात आली आहे. छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस, हुतात्मा चौक, चर्चगेट, मरीन ड्राइव्ह, पेडर रोड, हाजी अली, वांद्रे-वरळी सी लिंक, माहीम, प्रभादेवी, आणि छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनसकडे परत जाण्यासाठी बससेवा चालवली जाणार आहे. ही मॅरेथॉन सकाळी 5 ते दुपारी 1:30 या वेळेत होणार आहे.

मुंबई वाहतूक पोलीसांनी मॅरेथॉन मार्गावर वाहतूक निर्बंध लागू करणार आहेत. परिणामी, या मार्गावर सामान्यतः धावणाऱ्या सार्वजनिक बस मार्गांचे मार्ग बदलले जातील. बसेस सायन, डॉ. बाबासाहेब आंबेडकर रोड, जेजे हॉस्पिटल, वाडीबंदर, पी. डी'मेलो रोड आणि इतर पर्यायी मार्गाने प्रवास करतील, असे त्यात म्हटले आहे. Traffic Diversions for Mumbai Marathon 2025: मुंबई मॅरेथॉन दरम्यान वाहतूक मार्गात बदल, तपशील घ्या जाणून.

याशिवाय, मॅरेथॉन दरम्यान A-78, A-89, A-105, A-106, A-108, A-112, A-123, A-132 आणि A-155 या मार्गांसाठी बस सेवा तात्पुरत्या स्वरूपात बंद राहणार आहेत.