Ajit Pawar (Photo Credit: Twitter)

कोरोनावर संपूर्णपणे मात करण्यासाठी सर्वांनी नियमांचे पालन केले पाहिजे. त्यामुळे यंत्रणांनी नियमभंग करणाऱ्यांविरुद्ध अधिक धडकपणे कारवाई करण्याचे स्पष्ट निर्देश उपमुख्यमंत्री तथा पालकमंत्री अजित पवार यांनी आज प्रशासनाला दिले आहेत. कोरोनाविरुद्धची लढाई सर्वांचीचं असून नागरिकांची त्याला साथ मिळणे आवश्यक आहे. त्यामुळे प्रत्येकाने मास्कचा वापर व सुरक्षित अंतर ठेवण्याची दक्षता घ्यावी आणि कोरोनावर मात करण्यासाठी प्रशासनाला सहकार्य करावे, असे आवाहनही अजित पवार यांनी केले आहे.

आज विभागीय आयुक्त कार्यालयात उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या अध्यक्षतेखाली पुणे व पिंपरी चिंचवड महानगरपालिका क्षेत्रातील ‘कोरोना’बाबतच्या उपाययोजनाबाबत आढावा बैठक घेण्यात आली. यावेळी उपमुख्यमंत्री अजित पवार बोलत होते. (हेही वाचा - COVID-19 Update in Dharavi: धारावीत आज दिवसभरात आढळले 5 नवे कोरोनाचे रुग्ण- BMC)

यावेळी अजित पवार म्हणाले की, कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी सार्वजनिक शिस्त निर्माण करावीचं लागेल. त्यामुळे नियमभंग करणाऱ्यांवर नियमितपणे कारवाई झालीचं पाहिजे. सर्व नियमांचे काटेकोरपणे पालन होणे, हे सर्वांच्याचं हिताचे आहे. त्यामुळे सार्वजनिक हिताला बाधा आणणाऱ्यांवर तात्काळ कारवाई करावी. मास्क न लावणाऱ्या व सार्वजनिक ठिकाणी थुंकणाऱ्या व्यक्तीवर दंडात्मक कारवाई करण्यात यावी, असे निर्देश अजित पवार यांनी दिलं आहे.

कोरोनाबाधित रुग्णांवर उपचार करणाऱ्या ग्रामीण तसेच शहरी भागातील डॉक्टरांना तज्ञ डॉक्टर तसेच टास्क फोर्समार्फत कोरोना उपचाराबाबत प्रशिक्षण देणे गरजेचे आहे, त्यादृष्टीने कार्यवाही करावी. कोरोना कालावधीत पोलीस अहोरात्र कार्यरत आहेत. त्यातील बाधित पोलिसांच्या तसेच कार्यरत पोलिसांच्या आरोग्याची काळजी घ्यावी, त्यांच्या उपचार सुविधाबाबत दक्षता घेण्याचे निर्देशही अजित पवार यांनी यावेळी दिले.