
पुणे (Pune) शहरातील अत्यंत गजबजलेल्या आणि मध्यवर्ती परिसरातील स्वारगेट बसस्थानक (Swargate ST Bus Stand) परिसरात ज्या शिवशाही (Shivshahi Bus Rape Case) बसमध्ये तरुणीवर बलात्कार (Rape) झाल्याची धक्कादायक घटना पुढे आली आहे. ज्यामुळे केवळ पुणे शहरच नव्हे तर संपूर्ण जिल्ह्यात खळबळ उडाली. या घटनेचा संपूर्ण महाराष्ट्रातून निषेध व्यक्त होत आहे. दरम्यान, ज्या बसमध्ये हा प्रकार घडला ती बस आणि परिसरात अत्यंत धक्कादायक प्रकार उघडकीस येत आहे. या बसमध्ये कंडोम (Condoms), चादरी आणि कपडे, साड्या मोठ्या प्रमाणावर आढळून आल्या आहेत. शिवसेना (UBT) नेते वसंत मोरे यांनी हा धक्कादायक प्रकार प्रथम पुढे आणला आणि बस आगारातील सुरक्षा कर्मचाऱ्यांच्या संगणमताने इथे दररोजच अवैध कामे केली जात असल्याचा आरोप केला. त्यानंतर प्रसारमाध्यमांनी घटनास्थळाला भेट देऊन पडाळणी केली असता अनेक आक्षेपार्ह वस्तू या ठिकाणी आढळून आल्या. प्रसारमाध्यमांतून या वस्तूंची दृश्ये प्रसारित झाली आहेत.
साड्या, पॅन्ट आणि अंतर्वस्त्रे
स्वारगेट बस स्टँड परिसरातील ज्या शिवशाही बसमध्ये लैंगिक अत्याचाराची घटना घडली त्या ठिकाणी प्रसारमाध्यमांनी जाऊन पाहणी केली असता बसमध्ये मोठ्या प्रमाणावर साड्या, पॅन्ट्स आणि स्त्री-पुरुषांची अंतर्वस्त्रे आढळून आली. इतकेच नव्हे तर वेगवेगळ्या कंपनीचे वापरलेले आणि काही न वापरलेले कंडोम सुद्धा पाहायला मिळाले. बस आणि परिसरात सिगारेट पाकीटांचा खच पडल्याचे दिसून आले. शिवाय, खाद्यपदार्थांची रिकामी वेश्टने सुद्धा इथे आढळून आली. त्यामुळे या वस्तूंचा एकूण साठा आणि कचरा पाहता केवळ एक-दोन नव्हे तर पाठिमागील बऱ्याच दिवसांपासून येथे अवैध प्रकार चालत असावा असा संशय व्यक्त केला जात आहे. धक्कादायक म्हणजे स्वारगेट आगार परिसरात ही बस उभी असताना आणि या परिसराच्या सुरक्षेसाठी सुरक्षा व्यवस्था असताना देखील हा प्रकार कसा घडला याबाबत आश्चर्य व्यक्त होत आहे. (हेही वाचा, Pune Shocker: पुण्यातील स्वारगेट बस स्टँडवर बसमध्ये 26 वर्षीय महिलेवर बलात्कार; आरोपीविरुद्ध गुन्हा दाखल, तपास सुरु)
शिवसेना (UBT) नेते वसंत मोरे यांच्याकडून तोडफोड
घडलेला प्रकार उघडकीस येताच पुणे शहरातून विविध राजकीय पक्ष, संघटना आणि कार्यकर्त्यांकडून मोठ्या प्रमाणावर संताप व्यक्त करण्यात येत आहे. शिवसेना (UBT) नेते वसंत मोरे यांनी तर थेट स्वारगेट बस आगार सुरक्षा व्यवस्थापकांचे कार्यालय गाठले आणि त्याची तोडफोड केली. स्वरक्षा व्यवस्थापक आणि कर्मचाऱ्यांसाठी स्वतंत्र कार्यालय असून देखील आमच्या महिला आणि मुली सुरक्षीत नसतील तर ही कार्यालये कशासाठी आहेत? असा सवाल उपस्थित करत त्यांनी थेट कार्यालयाचीच तोडफोड केली. त्यांनी कार्यालयाच्या खिडक्यांची काचेची तावदाने लाकडी आणि लोखंडी वस्तूंनी फोडली. या वेळी त्यांचे समर्थकही मोठ्या प्रमाणावर उपस्थित होते. दरम्यान, सुरक्षा विभागाच्या संगणमतानेच परिसरात अवैध कामे नियमीत चालतात, त्यामुळेच या बसमध्ये कंडोम, साड्या, अंतर्वस्त्रे आणि सिगारेटची पाकीटे आढळून आल्याचा आरोप त्यांनी केला. (हेही वाचा, Swargate ST Bus Stand Vandalized: वसंत मोरे यांच्याकडून स्वारगेट बस स्थानकाची तोडफोड; ठाकरे गटाची शिवसेना आक्रमक)
काय आहे प्रकरण?
पुणे येथे नोकरीस असलेली 26 वर्षांची एक तरुणी फलटणला निघाली होती. प्रवासाला निघण्यासाठी ही तरुणी स्वारगेट बस स्थानकात आली होती. ती शिवशाही बसने जाणार होती असे समजते. याच वेळी दत्तात्रय रामदास गाडे नामक तरुण तिथ आला आणि त्याने या तरुणीस आपणही फलटणला जाणार आहोत असे सांगितले. शिवाय, आपली बस येथे नव्हे तर इतर ठिकाणी उभा असल्याचे सांगत त्याने तिला बोलण्यात गुंतवले. तरुणीशी संवाद साधत विश्वास निर्माण केला आणि त्यानंतर तो तिला अंधारात उभ्या असलेल्या शिवशाही बसमध्ये घेऊन गेला. मुलीने त्यास आक्षेप घेतला असता, दीर्घ पल्ल्याची बस असल्याने सर्व प्रवासी झोपले आहेत. आपण मोबाईलची बॅटरी सुरु करुन आत जाऊन पाहू शकता,असेही त्याने तिला सांगितले. त्यामुळे तरुणीचा विश्वास बसला ती बसमध्ये चढली असता संशयित आरोपीसुद्धा पाठिमागून बसमध्ये आला आणि त्याने बसचा दरवाजा आतून बंद केला. त्यानंतर त्याने तिच्यावर कथीतरित्या लैंगिक अत्याचार केले. घटनेनंतर आरोपी पसार झाला. तरुणीने पोलिसांना दिलेल्या माहितीनंतर प्रकरणाची वाच्यता झाली.