अभिनेता सुशांत सिंह राजपूत (Sushant Singh Rajput) याच्या आत्महत्येनंतर आज सामना च्या अग्रलेखातून संजय राऊत (Sanjay Raut) यांनी काही रोखठोक प्रश्न केले आहेत. सुशांतचे निधन कितीही चटका लावून जाणारे असले तरी त्याचा आता उत्सव झाला आहे अशा शब्दात टीका करताना राऊत यांनी राज्यात आर्थिक अडचणीमुळे जीव देणाऱ्यांना का महत्व दिले जात नाही असाही सवाल केला आहे. सुशांतच्या निधनानंतर त्याच्या बायकांशी असलेल्या अनेक भानगडी (ब्रेकअप) हाच उत्सवी गुऱ्हाळाचा बिंदू आहे, असे करून त्याच्या अगोदरच डिप्रेशनमुळे आत्महत्या केलेल्या आत्म्याला सुद्धा आणखीन नैराश्य देण्याचं काम केलं जातंय असेही राऊत यांनी म्हंटले आहे. सुशांत सिंह राजपूत याचा अखेरचा सिनेमा 'दिल बेचारा'च्या OTT प्लॅटफॉर्मवरील रिलीजमुळे कुटुंबिय नाराज? पाहा काय म्हणाला सुशांतचा भाऊ
संजय राऊत यांनी पुढे म्हंटले की, सुशांतचा मृत्यू हा खून असल्याचे म्हंटले जातेय, पण त्याने स्वतःच्या घरात आत्महत्या केली मग तो खून कसा? अनेक दिग्दर्शक, अभिनेत्यांनी आपल्याला असं काहीतरी होणार याची जाणीव होती असे म्हंटले मात्र त्यांनी सुशांतला वाचवण्यासाठी काही केले का नाही? सुशांतने कोणत्याही चिठ्ठीत किंवा अन्य कुठे कोणाचेही नाव लिहून ठेवलेले नाही तरीही लोकांची 11-11 तास चौकशी होत आहे ती कशासाठी? सुशांतला आर्थिक चणचण असल्याचे म्हणतात पण त्याचा दिवसाचा खर्च 10 लाख असल्याचे सुद्धा म्हंटले जाते मग खरोखरच त्याला आर्थिक अडचण होती का? एखाद्या व्यक्तीला नैराश्य आल्यास त्याला मानसोपचार वाले तरी काय करतील? इंदूर चे आध्यात्मिक गुरु भय्यूजी महाराज यांच्या बाबतही तेच झाले मग तपास आणि पुढे सुरु झालेल्या चर्चांमधून काय साध्य होणार आहे? देशात कोरोनामुळे रोज शे- पाचशे लोक जीव गमावतात, भारत- चीन सीमेवर 20जवान शहीद झाले तरीही सुशांतच्या आत्महत्येचे मार्केटिंग केले जातेय हे योग्य आहे का?
दरम्यान, अग्रलेखातून राऊत यांनी सुशांतला घेऊन येत्या काळात जॉर्ज फर्नांडिस यांच्या आयुष्यावर सिनेमा बनवण्याचा विचार सुद्धा बोलून दाखवला आहे. हा संभाव्य जॉर्ज आता पडद्याआड गेल्याने निश्चितच दुःख होत आहे असेही ते म्हणाले.