Sushant Singh Rajput Case | (Photo Credits: Archived, edited, symbolic images)

अभिनेता सुशांत सिंह राजपूत आत्महत्या (Sushant Singh Rajput Case) प्रकरणात राज्याचे पर्यटन मंत्री, शिवसेना युवा नेते आदित्य ठाकरे (Aditya Thackeray) यांचा कोणताही संबंध नाही. आदित्य ठाकरे यांना ना मी ओळखते, ना त्यांच्याशी कधी संपर्क आला. आदित्य यांच्याशी माझे फोनवर देखील बोलणे झाले नाही, असे रिया चक्रवर्ती (Rhea Chakraborty) हिने म्हटले आहे. सुशांत सिंह राजपूत आत्महत्या प्रकरणात ज्या पद्धतीने आदित्य ठाकरे यांचे नाव पुढे आणले जात होते ते पाहता रिया चक्रवर्ती हिचे वक्तव्य अत्यंत महत्त्वाचे मानले जात आहे.

रिया चक्रवर्ती हिने सुशांत सिंह आत्महत्या प्रकरणात आपल्या वकिलांच्या मार्फत एक पत्र सादर केले आहे. या पत्रात रिया हिने आदित्य यांच्याबाबत महत्त्वाचा खुलासा केला आहे. यासोबतच रियाने असेही म्हटले आहे की, सुशांत राजपूत आत्महत्या प्रकरणाची चौकशी सीबीआय या संस्थेद्वारे करण्यास माझा कोणताही विरोध नाही. परंतू, इथे मुद्दा कार्यक्षेत्राचा (Jurisdiction) आहे. बिहार पोलीस ज्या पद्धतीने या प्रकरणावर आणि त्याच्या चौकशीवर दावा सांगतात तो चुकीचा आहे. (हेही वाचा, Sushant Singh Rajput Case: साक्षीदारांना धमकावले जात आहे; भाजप आमदाराचा आरोप)

अभिनेता सुशांत सिंह राजपूत याचा मृतदेह बांद्रा येथील राहत्या घरात 14 जन 2020 या दिवशी आढळून आला. त्याच्या शवविच्छेदन अहवालात त्याने आत्महत्या केल्याचे म्हटले आहे. दरम्यान, सुरुवातीला हे प्रकरण बॉलिवूडमधील नेपोटीझमशी जोडण्यात आले. पुणे या प्रकरणाने राजकीय वळण घेतले. बिहार पोलीस किंवा सरकार विरुद्ध महाराष्ट्र पोलीस अथवा सरकार असा सामना रंगला. यात मध्येच राज्याचे पर्यटनमंत्री आदित्य ठाकरे यांचे नाव घेण्यात आले. तेव्हापासून सुशांत सिंह राजपूत हे प्रकरण राजकीयदृष्ट्या अत्यंत टोकदार बनत चालले आहे. त्यामुळे रिया चक्रवर्ती हिची आदित्य ठाकरे यांच्याबाबतची प्रतिक्रिया महत्त्वाची मानली जात आहे.