Pawar vs. Pawar: बारामती कोणाची? साहेबांची की दादांची? सुप्रिया सुळे विरुद्ध सुनेत्रा पवार 'सामना' रंगणार?
Supriya Sule, Sunetra Pawar | (Photo courtesy: archived, edited, symbolic images)

राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष (NCP) अजित पवार (Ajit Pawar) गटाचा एक मेळावा नुकताच पार पडला. ज्यामध्ये अजित पवार यांनी शरद पवार (Sharad Pawar) गटाकडे असलेल्या चारही लोकसभा जागा लढविण्याचा निर्धार व्यक्त केला. या निर्धारामुळे बारामती लोकसभा मतदारसंघात (Baramati Lok Sabha Constituency) 'पवार विरुद्ध पवार' (Pawar vs. Pawar) असा सामना रंगणार हे आता स्पष्ट झाले आहे. 'साहेब विरुद्ध दादा' असे या सामन्याला स्वरुप प्राप्त असले तरी, प्रत्यक्षात लढत कशी होणार याबाबत उत्सुकता आहे. शरद पवार गटाकडून सुप्रिया सुळे (Supriya Sule) याच उमेदवार असतील हे निश्चित आहे. मात्र, अजित पवार यांच्याकडून कोण मैदानात उतरणार याबातब उत्सुकता आहे. या मेळाव्यानंतर अजित पवार यांच्या पत्नी सुनेत्रा पवार (Sunetra Pawar) आणि चिरंजीव पार्थ पवार यांची नावे चर्चेत आहेत.

नणंद विरुद्ध भावजय?

अजित पवार गटाने जर सुनेत्रा पवार यांना मैदानात उतरवले तर बारामतीमध्ये 'नणंद विरुद्ध भावजय' असा सामना रंगण्याची चिन्हे आहेत. सुप्रिया सुळे या शरद पवार यांच्या कन्या आणि अजित पवार यांच्या भगिनी आहेत. त्यामुळे त्या सुनेत्रा यांच्या नात्याने नणंद लागतात. आजवर राज्याच्या इतिहासात पवार कुटुंबीयांकडे प्रचंड आदराने पाहिले जात होते. त्यामुळे सहाजिकच नणंद भावजय यांचे नातेही किती सलोख्याचे आहे हे महाराष्ट्राने अनुभवले आहे. आजही विविध कार्यक्रमांतून त्याचे दर्शन घडते. अशा वेळी, राजकारणाच्या आखाड्यात हे नाते जर विरोधक म्हणून परस्परांविरोधात उभे ठाकले तर त्याचे स्वरुप कसे असेल याबाबत सर्वांना उत्सुकता आहे. (हेही वाचा, Ajit Pawar Letter: अजित पवार महायुतीत का गेले?)

आत्या विरुद्ध भाचा?

दुसऱ्या बाजूला अशीही एक चर्चा आहे की, अजित पवार गटाकडून त्यांचे पार्थ पवार यांना संधी दिली जाऊ शकते. खरे तर पार्थ पवार यांनी लोकसभा निवडणूक 2019 मध्ये मावळ येथून निवडणूक लढवली होती. मात्र, तत्कालीन शिवसेना उमेदवार श्रीरंग बारणे यांच्याकडून त्यांना पराभव स्वीकारावा लागला. त्यामुळे एकदा आपटी खाल्यानंतरही पक्ष पुन्हा त्यांच्याच गळ्यात उमेदवारीची माळ घालणार का? याबाबतही उत्सुकता आहे. तसे घडल्यास बारामती लोकसभा मतदारसंघात आत्या विरुद्ध भाचा अशी लढत पाहायला मिळू शकते. सुप्रिया सुळे या पार्थ पवार यांच्या आत्या आहेत. (हेही वाचा, Amol Kolhe meets Ajit Pawar: कोल्हे सांगा कोणाचे? अजित पवार यांच्या भेटीमुळे उलटसुलट चर्चा)

पवार कुटुंबीय हे राज्याच्या राजकारण आणि समाजकारणातील एक शक्ती म्हणून ओळखले जाते. पवार कुटुंबीय वेगवेगळ्या क्षेत्रात सक्रीय आहे. आजवर पवार कुटुंबीयांतील मतभेत कधीही चव्हाट्यावर आले नाहीत. अजित पवार यांच्या रुपात प्रथमच अशा प्रकारची वेगळी भूमिका पवार कुटुंबातील कोणीतरी घेतल्याचे पाहायला मिळत आहे. ज्यामुळे राजकीय वर्तुळात आश्चर्य व्यक्त होत आहे.