शनिवार, 22 ऑगस्ट पासून सुरू होत असलेल्या गणेशोत्सवानिमित्त (Ganeshotsav) सर्वोच्च न्यायालयाने एक महत्वाचा निर्णय दिला आहे. गणेश चतुर्थीनिमित्त कोणत्याही प्रकारचा उत्सव आयोजित करण्यास सर्वोच्च न्यायालयाने नकार दिला आहे. अशा प्रसंगी गर्दीवर नियंत्रण ठेवणे हे कठीण आव्हान असते, असे कोर्टाने म्हटले आहे. कोरोना विषाणूमुळे (Coronavirus) आजकाल मंदिरात मोठे कार्यक्रम होत नाहीत. अनेक उत्सवही साध्या पद्धतीने साजरे होत आहेत. आता जैन भक्तांना मुंबईतील तीन जैन मंदिरात (Jain Temples) जाऊन, 22, 23 ऑगस्टला पर्युषण पर्वाची पूजा करण्याची परवानगी देण्यात आली आहे. परंतु यासाठी सरकारने धार्मिक स्थळांकरिता केलेल्या मार्गदर्शक तत्त्वांचे पालन करावे लागेल, असे कोर्टाने स्पष्ट केले आहे.
एएनआय ट्वीट -
A Bench headed by Chief Justice SA Bobde said that this concession cannot be applied to any other temple or for Ganesh Chaturthi celebrations which involve large congregation. https://t.co/FLgVUwAqzc
— ANI (@ANI) August 21, 2020
जैन धर्मियांना जरी दोन दिवस मंदिरे उघडे ठेवण्याची परवानगी दिली असली तरी, गणेश चतुर्थीच्या कार्यक्रमांना कोर्टाने बंदी घातली आहे. सर्वोच्च न्यायालयाने जैन धर्मियांना मुंबईतील दादर, भायखळा आणि चेंबूर येथील जैन मंदिरांच्या दर्शनासाठी परवानगी दिली आहे. करोनाच्या मार्गदर्शक सूचनांनुसार मंदिरात जाण्याची परवानगी दिली जाईल. परंतु सुनावणीदरम्यान सर्वोच्च न्यायालयाने हे स्पष्ट केले की, हे आदेश गणेशोत्सवासारख्या महोत्सवाला लागू होणार नाहीत. (हेही वाचा: जिम सुरु करण्याच्या मागणीसाठी जिमचे मालक व ट्रेनर्स यांची उच्च न्यायालयात धाव; मालमत्ता कर, वीज बिले आणि जीएसटी माफ करण्याची विनंती)
कोरोनाची परिस्थितीबाबत महाराष्ट्र सरकारच्या विरोधावर मुख्य न्यायाधीश एस.ए. बोबडे म्हणाले की, जिथून पैसा मिळतो अशी ठिकाणे जसे की, मॉलला उघडण्यास परवानगी देताना सरकार मागे पडत नाही. परंतु धार्मिक ठिकाणी परवानगी देण्यात अडचण आहे. कोर्टाने ओडिशामधील जगन्नाथ यात्रेचा हवाला देत सांगितले की, कोरोनाच्या काळातही तो उत्सव चांगला झाला. कोर्टाने असेही म्हटले आहे की, इतर सणांची परिस्थिती लक्षात घेता केस-टू-केस आधारावर त्याबाबत निर्णय घेतला जाईल. सध्या मंदिरे उघडण्याची परवानगी फक्त जैन धर्मियांनाच आहे.