कोरोना विषाणूच्या (Coronavirus) काळामध्ये लॉक डाऊन (Lockdown) सुरु करण्यात आले. त्यावेळी ज्या गोष्टी सर्वात आधी बंद केल्या गेल्या त्यामध्ये जिम (Gym) ही गोष्ट प्रामुख्याने होती. आता अनलॉकमध्ये अनेक गोष्टी सुरु करण्यास परवानगी दिली आहे, मात्र अजूनही जिम उघडण्यास परवानगी नाही. गेले 4 महिने जिम बंद असल्याने जिम मालकांचे, ट्रेनर्सचे बरेच नुकसान झाले आहे. जिम बंद असल्याने आर्थिक अडचणींचा सामना करावा लागल्याने काही मालकांना आत्महत्येस प्रवृत्त केल्याच्या घटना घडल्या आहेत. राज्यभरातील अनेकांनी सरकारच्या निर्णयाचा निषेध केला आहे. आता शहरातील जिमचे मालक, प्रशिक्षक आणि वकील यांनी गुरूवारी मुंबई उच्च न्यायालयामध्ये धाव घेतली.
जिम, व्यायामशाळा लवकर सुरु करा या मागणीसाठी जिमच्या मालकांनी न्यायालयाचा दरवाजा ठोठावला आहे. आर्थिक विवंचनेचा सामना करत असलेल्या सेंटर्सचा प्रलंबित मालमत्ता कर, वीजबिल आणि जीएसटी माफ करण्याची सूचना राज्य सरकारला करावी, अशी विनंतीही या याचिकेत केली आहे. रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाचे अध्यक्ष सतीश गायकवाड, जिम मालक प्रसन्न कांबळे, फिटनेस प्रेमी क्रांती सहाणे, स्वप्नील गिरमे आणि सूरज जाधव यांनी ही याचिका दाखल केली आहे.
या याचिकेमध्ये, फिटनेस सेंटरच्या बंदमुळे त्यांच्या मालकांच्या जीवनावर होणाऱ्या दुष्परिणामांकडे लक्ष वेधले आहे. यात म्हटले आहे. ‘महाराष्ट्रभर मार्चपासून जिम आणि फिटनेस सेंटर बंद पडल्याने लोकांचे जीवन धोक्यात आले आहे. या क्षेत्रातील लोकांच्या जीवनामध्ये प्रचंड चिंता आणि ताण उद्भवला आहे. जिम सुरु करण्याच्या निर्णयाबाबत गोंधळ आणि अफवांमुळे अधिक आत्महत्या होऊ शकतात. तरी जर का जिम सुरु केल्या, तर या लोकांच्या जीवनामध्ये थोडे स्थैर्य येऊन या प्राणघातक विषाणूविरूद्ध लढायला मदत होईल.’ (हेही वाचा: राज्यातील शैक्षणिक वर्ष जानेवारी महिन्यापासून सुरु करा; मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या प्रस्तावाला UGC चा पाठिंबा)
याबाबत, जर दारूची दुकाने पुन्हा सुरू होऊ शकतात तर जिम का नाही? असा प्रश या याचिकाकर्त्यांचे वकील तोसीफ शेख यांनी विचारला आहे.