Arrest | Representational Image | (Photo Credits: Pixabay)

‘बुल्ली बाई’ या अॅपवर (BulliBai App) किमान 100 प्रभावशाली मुस्लिम महिलांची छायाचित्रे अपलोड करून त्यांचा लिलाव होत असल्याची धक्कादायक घटना समोर आली होती. देशात याबाबत खळबळ उडाली असून, सोशल मिडियावर घडल्या प्रकाराबाबत प्रचंड टीका होत आहे. याआधी मुंबई सायबर पोलिसांनी हे अॅप तयार करून त्याचा प्रचार करणाऱ्या ट्विटर हँडलविरोधात एफआयआर नोंदवला होता. आता माहिती मिळत आहे की, 'बुल्लीबाई' अॅपच्या संदर्भात मुंबई पोलिसांच्या सायबर सेलने बेंगळुरू येथून एका 21 वर्षीय अभियांत्रिकी विद्यार्थ्याला ताब्यात घेतले आहे.

मुंबई पोलिसांनी बेंगळुरू येथून ताब्यात घेतलेल्या संशयिताचे वय वगळता त्याची ओळख अद्याप उघड केलेली नाही. पोलिसांनी अज्ञात आरोपींविरुद्ध आयपीसी आणि आयटी कायद्याच्या संबंधित कलमांतर्गत गुन्हा दाखल केला आहे. ट्विटर हँडल आणि 'बुल्ली बाई' अॅपचा डेव्हलपरविरुद्ध मुंबईतील पश्चिम विभागातील सायबर पोलिस स्टेशनमध्ये कलम 153(A), 153(B), 295(A), 354D, 509, 500 आणि IT कायद्याच्या कलम 67 अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

याआधी साधारण 6 महिन्यांपूर्वी 'सुल्ली डील्स' द्वारे मुस्लिम महिलांच्या फोटोंच्या लिलावाची धक्कादायक बाब समोर आली होती. त्यानंतर आता असेच दुसरे अॅप 'बुल्ली बाई' नावाने व्यासपीठावर आले आहे. याठिकाणी महिला पत्रकारांसह 100 हून अधिक प्रभावशाली मुस्लिम महिलांच्या फोटोचा 'लिलाव' करण्यात आला होता. या संदर्भात Twitter आणि Github या सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर ईमेल पाठवले आहेत. त्यांच्याकडून उत्तरे प्रलंबित आहेत. 1 जानेवारी रोजी, मुस्लिम महिलांची छायाचित्रे अज्ञात गटाने GitHub चा वापर करून वापरून 'बुल्ली बाई' नावाच्या अॅपवर अपलोड केली. (हेही वाचा: Ambernath Gangrape Case: अंबरनाथमध्ये 21 वर्षीय महिलेवर सामूहिक बलात्कार, तिघांना अटक)

शिवसेना खासदार प्रियांका चतुर्वेदी यांनी शनिवारी मुंबई पोलीस आणि माहिती व तंत्रज्ञान मंत्री अश्विनी वैष्णव यांना 'बुल्ली बाई’ अॅपवर कारवाईची मागणी केली होती. महाराष्ट्राच्या गृहमंत्रालयानेदेखील ही बाब अत्यंत गंभीरतेने घेऊन, याबाबत चौकशी व कारवाईचे आदेश दिले होते.