Sambhaji Raje (Photo Credits: Facebook)

बीड जिल्ह्यातील विवेक राहाडे या युवकाने नीट परीक्षेचा पेपर अवघड गेल्याने आत्महत्या केली. मात्र, विवेकने मराठा आरक्षणासाठी (Maratha Reservation) आत्महत्या केल्याचा दावा त्यांच्या कुटुंबियांनी केला आहे. या घटनेनंतर राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते पार्थ पवार (Parth Pawar) यांनी मराठा आरक्षण प्रकरणी सर्वोच्च न्यायालयात हस्तक्षेप याचिका दाखल करणार असल्याचं सांगितलं आहे. अशातचं आता खासदार छत्रपती संभाजीराजे (Chhatrapati Sambhaji Raje) यांनी आत्महत्या हा मराठा आरक्षणावरील पर्याय नसल्याचं म्हणत युवकांना आत्महत्या न करण्याचं आवाहन केलं आहे.

संभाजीराजे यांनी आपल्या ट्विटर हँडवरून यासंदर्भात एक पोस्ट केली आहे. या पोस्टमध्ये त्यांनी म्हटलं आहे की, 'विवेक राहाडे या युवकाने समाजासाठी स्वतःच्या प्राणांची आहुती दिली. त्यांच्या परिवारासोबत आमच्या संवेदना आहेत. घरातील कर्तृत्वाला आलेला युवक असा अकाली जाणं, ही कधीही न भरून निघणारी हानी आहे. मी त्यांच्या दुःखात सहभागी आहे. समाजासाठी बलीदान दिलेल्या या मावळ्याला विनम्र श्रध्दांजली!' (हेही वाचा - Maratha Reservation: मराठा आरक्षण प्रकरणी पार्थ पवार सर्वोच्च न्यायालयात हस्तक्षेप याचिका दाखल करणार; बीडमधील तरुणाच्या आत्महत्येनंतर घेतला निर्णय)

माझ्या निडर वाघांनो तुम्हीच जर असे हातबल होऊन आत्मबलिदान देणार असाल, तर मला चांगलं वाटणार आहे का? या लढाईतील प्रत्येक मावळा माझ्यासाठी लाखमोलाचा आहे. सर्वांना माझी नम्र विनंती आहे कोणीही असे पर्याय निवडू नयेत. एक लक्षात ठेवा हा समाज, "लढून मरावं, मरून जगावं" हेच आम्हाला ठावं, असे पोवाडे गाणारा आहे. माझ्या शूर सरदारांनो खचून जाऊ नका. आज परिस्थिती जरी आपल्या विरोधात वाटत असली, अंधारात जात असलेली वाटत असली तरी, उद्या नक्की पहाट होईल. सर्व काही ठीक होईल. आपण लढाई जिंकूंच, असा विश्वासदेखील संभाजीराजे यांनी व्यक्त केला आहे.

मराठा आरक्षणाची अटीतटीची लढाई आपण लढत आहोत. कोणत्याही परिस्थितीत हा लढा असाच चालू राहील. आणि मला विश्वास आहे की आपण नक्की जिंकू! हा लढा सुरू असताना, युवकांनी आत्महत्या करू नयेत. आत्महत्या हा पर्याय अजिबात नाही, असं आवाहनही संभाजीराजे छत्रपती यांनी मराठा समाजातील युवकांना केलं आहे.