Maharashtra: संजय राऊत- आशिष शेलार यांच्या भेटीवरून सुधीर मुनगंटीवार यांचे सूचक विधान
Sudhir Mungantiwar | Photo Credits: Twitter/ ANI

शिवसेनेचे नेते संजय राऊत (Sanjay Raut) आणि भाजप आमदार आशिष शेलार (Ashish Shelar) यांच्यात गुप्त भेट झाली आहे. सोमवारपासून सुरू होत असलेले राज्य विधिमंडळाचे पावसाळी अधिवेशन आणि राजकीय संघर्ष याच्या पार्श्वभूमीवर या भेटीवरुन अनेक तर्कवितर्क लावले जात आहेत. तसेच भाजप आणि शिवसेना पुन्हा एकत्र येणार का? अशा चर्चांनाही उधाण आले आहे. याच भेटीवरून माजी अर्थमंत्री आणि भाजप नेते सुधीर मुनगंटीवार (Sudhir Mungantiwar) यांनी रोखठोख प्रतिक्रिया दिली आहे. “भाजप शिवसेनेसोबत जाण्यासाठी प्रयत्न करणार नाही. राष्ट्रवादी आणि काँग्रेससोबत जाऊन चूक झाली, असे शिवसेनेला वाटले तर ते येतील. तेव्हा भाजप विचार करेल,” असे मुनगंटीवार यांनी म्हटले आहे.

दरम्यान, सुधीर मुनगटीवार यांनी नागपूर येथे टीव्ही9 मराठी वृ्त्तवाहिनीशी बोलत असताना संजय राऊत आणि आशिष शेलार यांच्या भेटीसंदर्भात भाष्य केले आहे. ते ते म्हणाले की, “भाजप आणि शिवसेना नेत्यांच्या भेटी होत असतात. ही परंपरा आहे. पण भाजप सत्तेसाठी आता शिवसेनेसोबत जाण्यासाठी प्रयत्न करणार नाही. काँग्रेस आणि राष्ट्रवादीसोबत जाऊन चुक झाली असं शिवसेनेला वाटलं तर ते येतील. तेव्हा भाजप विचार करेल” असे सुधीर मुनगंटीवार यांनी म्हटले आहे. हे देखील वाचा- मुंबई, पुण्यात LPG दरवाढी विरोधात आंदोलन करणारे राष्ट्रवादी काँग्रेसचे कार्यकर्ते पोलिसांच्या ताब्यात

संजय राऊत आणि आशिष शेलार यांच्यात आज मुंबईतील नरीमन पॉईंट परिसरात अर्धा तास बैठक झाल्याची माहिती आहे. ही बैठक नेमकी कशामुळे झाली ? चर्चेचा विषय काय होता ? या सर्व गोष्टी सध्यातरी गुलदस्त्यातच आहेत. परंतु, या भेटीनंतर राजकीय वर्तुळात नव्या चर्चा सुरू झाल्या आहेत.