Death | Representative Photo (Photo Credit: PTI)

Ahmednagar: अहमदनगर जिल्ह्यातील लोणी गावात बारावीचे पेपर देणाऱ्या विद्यार्थिनीने आजोबांसोबत रात्रीचे उरलेले इडली-सांबर खाल्ले. त्यानंतर दोघांनाही विषबाधा झाली. परंतु, उपचारादरम्यान विद्यार्थीनीचा सोमवारी मृत्यू झाला. तेजस्विनी मनोज दिघे असे मयत विद्यार्थिनीचे नाव आहे.

शिक्षण घेऊन डॉक्टर होण्याचे तेजस्विनी हिचे स्वप्न होतं. या घटनेमुळे परिसरात हळहळ व्यक्त होत आहे. सुदैवाने तिचे आजोबा यातून बचावले आहेत. प्राप्त माहितीनुसार, लोणी येथील तेजस्विनी दिघे बाभळेश्वर येथील कनिष्ठ महाविद्यालयात शिक्षण घेत होती. तिची बारावीची परीक्षा सुरू होती. विज्ञान शाखेचे काही पेपर तिने दिले होते. गेल्या बुधवारी रसायनशास्त्राचा पेपर होता. त्या दिवशी सकाळी तिने आणि तिचे आजोबा भीमराज दिघे यांनी रात्रीचे इडली-सांबर खाल्ले. (हेही वाचा -CM Eknath Shinde On Unseasonal Rain: अवकाळी पावसामुळे नुकसान झालेल्या शेतकऱ्यांच्या पिकांचे तातडीने पंचनामे करा; मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे जिल्हाधिकाऱ्यांना आदेश)

तेजस्विनी तिचे आजोबा भीमराज दिघे हे रयत शिक्षण संस्थेमधून मुख्याध्यापक म्हणून निवृत्त झाले आहेत. रात्रीचे शिळे अन्न खाणे त्यांना चांगलेच महागात पडले. यामुळे दोघांनाही त्रास होऊ लागला. त्यामुळे त्यांना लोणी येथील प्रवरा मेडिकल ट्रस्टच्या रुग्णालयात दाखल करण्यात आले. या दोघांना पोटदुखीचा त्रास होत होता. मात्र, नेमके निदान होत नव्हते. त्यामुळे त्यांना प्रथम संगमनेरला आणि त्यानंतर पुण्यातील केईएम हॉस्पिटलला हलविण्यात आले.

तेव्हापासून त्यांच्यावर पुण्यातच उपचार सुरू होते. अखेर तेजस्विनीची झुंज अपयशस्वी ठरली. सोमवारी तिचा रुग्णालयातच मृत्यू झाला. मात्र, यात तेजस्विनीचे आजोबा मात्र बचावले आहेत. तेजस्विनी विज्ञान शाखेतून बारावीचे शिक्षण घेत होती. तेजस्विनीचे डॉक्टर होण्याचे तिचे स्वप्न अखेर अपूर्ण राहिले आहे. तेजस्विनीच्या मृत्यूमुळे संपूर्ण कुंटुंबावर दु:खाचा डोंगर कोसळला आहे.