CM Eknath Shinde On Unseasonal Rain: राज्यात सोमवारी अनेक ठिकाणी अवकाळी पावसाने (Unseasonal Rain) हजेरी लावली. अचानक झालेल्या अवकाळी पावसाने शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झाले. परिणामी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (CM Eknath Shinde) यांनी जिल्हाधिकाऱ्यांना अवकाळी पावसामुळे नुकसान झालेल्या शेतकऱ्यांच्या पिकांचे तातडीने पंचनामे करण्याचे आदेश दिले आहेत. सरकार संकटग्रस्त शेतकऱ्यांच्या पाठीशी आहे. यादृष्टीनं महसूल यंत्रणेनं लगेच कामाला लागावं आणि पंचनामे करावेत, असेही निर्देश मुख्यमंत्र्यांनी यावेळी दिले.
दरम्यान, सोमवारी ठाणे, पालघर, वाशीम, नाशिक, छत्रपती संभाजीनगर, पैठण, गंगापूर परिसरातील अनेक तालुक्यात वादळी वाऱ्यासह अवकाळी पाऊस झाला. त्यामुळे काढणीला आलेल्या पिकांचे नुकसान झाले. हातातोंडाशी आलेला घास अवकाळी पावसामुळे हिरावून गेल्याने शेतकरी हवालदील झाला आहे. त्यामुळे नुकसानग्रस्त पिकाचे लवकरात-लवकर पंचनामे करावे, अशा सूचना मुख्यमंत्र्यांनी दिल्या आहेत. (हेही वाचा - Maharashtra Weather Forecast: मुंबई, ठाणे सह महाराष्ट्रातील 'या' भागात पुढील 3-4 तास गडगडाटाचे - हवामान खात्याचा अंदाज)
तथापी, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आज सकाळी मुख्य सचिव तसेच जिल्हाधिकाऱ्यांशी बोलून त्यांच्याकडून परिस्थितीची माहिती घेतली. यावेळी महसूल विभागाने तातडीने नुकसानग्रस्त शेतकऱ्यांच्या शेतीचे पंचनामे करावे, असे निर्देशही यावेळी मुख्यमंत्र्यांनी दिले.
राज्यात ठिकठिकाणी पडलेल्या पावसामुळे कांदा, गहू, द्राक्ष पिकाचे मोठे नुकसान झाले आहे. हवामान विभागाने वर्तवलेल्या अंदाजानुसार, मुंबई, ठाण्यासह नाशिक अहमदनगर, छत्रपती संभाजी नगर, बीड, धुळे, नंदुरबार, जळगाव आणि पश्चिम विदर्भातील काही भागात पाऊस पडण्याची शक्यता आहे.