Maharashtra Weather : राज्यात अवकाळीचा जोर असतानाच पुन्हा एकदा तीव्र उष्णतेची लाट जाणवणार आहे. 27 ते 29 एप्रिल या तीन दिवसांत राज्या उष्णतेची तीव्र लाट असण्याची शक्यता (Heat Wave Alert) हवामान विभागाने वर्तविली आहे. यात विशेषता ठाणे, मुंबईसह विदर्भातील नागरिकांना या उष्णतेच्या लाटेचा सामना करावा लागणार आहे. मराठवाडा आणि मध्य महाराष्ट्र, तसंच उत्तर कर्नाटक आणि परिसरावर चक्राकार वाऱ्याची स्थिती (Maharashtra Weather) आहे.
मराठवाड्यापासून उत्तर तमिळनाडूपर्यंत तसेच, मध्य प्रदेशातील चक्राकार वाऱ्यांमुळे विदर्भ, मराठवाडा आणि कर्नाटकपर्यंत हवेचे कमी दाबाचे पट्टे सक्रिय असल्याची माहिती मिळत आहे. यामुळे ढगाळ आकाशासह राज्यामध्ये पावसाला पोषक हवामान होत आहे. आज मध्य महाराष्ट्र, मराठवाडा, विदर्भात वादळी वारे, विजांसह पावसाचा इशारा कायम आहे.
धुळे (४२), मालेगाव (४२), जळगाव (४१.७), सोलापूर (४१.२), वाशीम (४०.६), ब्रह्मपुरी (४०.५), अकोला (४०.४), बीड (४०.१), वर्धा (४०.१), अमरावती (४०) या ठिकाणांवरील कमाल तापमान ४० अंशांपेक्षा अधिक होते. तर पालघर, ठाणे, मुंबई, रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग या जिल्ह्यांसाठी उष्ण आणि दमट हवामानासाठी येलो अलर्ट जारी करण्यात आला आहे. जळगाव, नाशिक, नगर, छत्रपती संभाजीनगर, बीड, जालना, बुलडाणा, अकोला, अमरावती, वाशीम, यवतमाळ, वर्धा या जिल्ह्यांसाठी वादळी पावसाचा (Rain) इशारा हवामान विभागाने दिला आहे.