Heart Attack प्रतिकात्मक प्रतिमा (फोटो सौजन्य - Pixabay)

रस्तावरील खड्डे जीवावर बेतल्याच्या अनेक घटना समोर येत असताना पण कोल्हापूरात रस्त्यातील एक खड्डा वृद्धाला जीवनदान देऊन गेल्याचा चमत्कार समोर घेऊन आला आहे. सिनेमाच्या पटकथेप्रमाणे ही घटना वाटत असली तरीही कोल्हापुरात (Kolhapur) ती वास्तवात घडलेली घटना आहे. पांडुरंग उलपे यांना मृत घोषित केल्यानंतर हॉस्पिटल मधून घरी अंत्यविधीला नेत असताना हा प्रकार घडला आहे. अ‍ॅम्ब्युलंस अचानक खड्ड्यात आदळली आणि मृत पांडुरंग यांची हालचाल झाल्याचं वृत्त आहे.

कोल्हापूरच्या कसबा बावडा मधील हा प्रकार आहे. पांडुरंग उलपे हे 15 दिवसांपूर्वी हरिनामाचा जप करत असताना त्यांना हार्ट अटॅक आला, त्यानंतर पांडुरंग यांना हॉस्पिटल मध्ये नेण्यात आले. त्यांच्यावर उपचार सुरू होते मात्र डॉक्टरांनी त्यांना मृत घोषित केले. घरी अंत्यविधीची तयारी सुरू होत होती. रस्त्यावरच्या खड्ड्यामुळे अ‍ॅम्ब्युलंसला धक्का बसला आणि पांडुरंग यांची हालचाल सुरू झाली. हा प्रकार पाहून त्यांना पुन्हा हॉस्पिटल मध्ये नेले. आता ते ठीक असून पांडुरंग उलपे स्वतः चालत घरी आले आहेत. नक्की वाचा: Bihar Miracle: आश्चर्यकारक प्रकार, मृत महिला 18 तासांनी जिवंत झाली, डॉक्टरही हैराण .

65 वर्षीय पांडुरंग उलपे यांना हार्ट अटॅक आल्यानंतर तातडीने गंगावेश येथील खासगी रुग्णालयात त्यांना दाखल केले होते. ही घटना 16 डिसेंबरच्या रात्रीच्या आहे. अ‍ॅम्ब्युलंसचं चाक खड्ड्यात आदळल्यानंतर पुन्हा हालचाल करू लागलेल्या उलपेंना कसबा बावड्यातील डी वाय पाटील हॉस्पिटल कडे दाखल केले. त्यानंतर डॉक्टरांचे प्रयत्न फळाला आले. हळूहळू त्यांच्या प्रकृतीमध्ये सुधार झाला. बुधवारी ( 1  जानेवारी) सकाळी हॉस्पिटलमधून डिस्चार्ज मिळाल्यानंतर गावकर्‍यांनी उत्साहात त्यांचं स्वागत केले. त्यांचं औक्षण करून, फुलांच्या पायघड्या घालून त्यांचं स्वागत झाले. पांडुरंग उलपे यांना पुनर्जन्म मिळाल्याची मात्र जिल्हाभर चर्चा सुरू आहे. अनेकांनी ही पांडुरंगाची कृपा म्हटली आहे.