Abu Azami (PC - Facebook)

Abu Azami On Live in Relationship: काही महिला पुरुषासोबत वर्षभर लिव्ह इन रिलेशनशीपमध्ये राहतात आणि नंतर सांगतात माझा बलात्कार झाला, अशी प्रतिक्रिया समाजवादी पक्षाचे नेते अबू आझमी (Abu Azami) यांनी पूजा चव्हाण आत्महत्या प्रकरणावर टीव्ही 9 मराठी वृत्तवाहिनीला दिली आहे. शिवसेना नेते आणि वनमंत्री संजय राठोड (Sanjay Rathod) यांची पूजा चव्हाण आत्महत्या प्रकरणात (Pooja Chavan Suicide Case) चौकशी करणं आवश्यक आहे. चौकशी न करता संजय राठोड यांना दोषी ठरवणे चुकीचे असल्याचं अबू आझमी यांनी म्हटलं आहे.

यासंदर्भात अधिक बोलताना अबू आझमी म्हणाले की, लिव्ह इन रिलेशनशीप हा आपल्या देशातील कायदा चुकीचा आहे. या कायद्यानुसार कोणतीही स्त्री लग्नाशिवाय कोणत्याही व्यक्तीसोबत राहू शकते. तुम्ही एका महिलेला पुरुषासोबत लिव्ह इन रिलेशनमध्ये राहू देता. त्यानंतर सांगता की, हा कोणता गुन्हा नाही. मग काही महिला पुरुषांसोबत वर्षभर एकत्र राहतात आणि नंतर सांगतात की, माझा बलात्कार झाला. (वाचा - Pooja Chavan Suicide Case: पूजा चव्हाण आत्महत्या प्रकरणावरुन नारायण राणे यांचे महाविकास आघाडी सरकारवर गंभीर आरोप)

दरम्यान, अबू आझमी पुढे बोलताना म्हणाले, कोणत्याही महिलेने परपुरुषासोबत राहू नये, हा इस्लामी कायदा आहे. हे प्रत्येक धर्मासाठी लागू आहे. परंतु, आता आधुनिक काळात पाश्चात्य वारे वाहू लागल्याने लोक वाहवत जात आहेत. याचा अनेकजण गैरफायदा घेत आहेत. त्यामुळे पूजा चव्हाण आत्महत्या प्रकरणाची चौकशी होणं गरजेचं आहे. चौकशीनंतर सत्य सर्वांच्या समोर येईल, असंही अबू आझमी यांनी म्हटलं आहे.

पूजा चव्हाणच्या आत्महत्येनंतर संपूर्ण महाराष्ट्राचे वातावरण ढवळून निघालं आहे. विरोधी पक्षांतील अनेक नेत्यांनी या प्रकरणावरून ठाकरे सरकारवर निशाणा साधला आहे. यातील काही नेत्यांनी या प्रकरणात शिवसेना नेते आणि वनमंत्री संजय राठोड यांचे नाव घेतले आहे. संजय राठोड यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याकडे आपला राजीनामा सोपवल्याचे वृत मंगळवारी प्रसारमाध्यमांत झळकत होतं. मात्र, शिवसेना नेते खासदार संजय राऊत यांनी हे वृत्त फेटाळून लावलं आहे.