
सोलापूर (Solapur) बार असोसिएशनचे वकील राजेश कांबळे (Advocate Rajesh Kamble) यांची निर्घृण हत्या झाल्याची धक्कादायक माहिती आहे. राजेश कांबळे हे गेले काही दिवस बेपत्ता होते. त्यांच्या बेपत्ता असण्याबाबत सोलापूर बार असोसिएशन ने सोलापूर पोलीस (Solapur Police) आयुक्तालयात तक्रार दिली होती. दरम्यान, त्यांची निर्घृण हत्या झाल्याची धक्कादायक बातमी आली आणि सोलापूर शहरात एकच खळबळ उडाली. ही हत्या इतकी भयानक होती की, अॅड. राजेश कांबळे यांच्या मृतदेहाचे तुकडे करुन ते पोत्यात भरुन ठेवण्यात आले होते. या प्रकरणाची पोलिसांनी गंभीर नोंद घेतली असून, तपास सुरु केला आहे.
प्राप्त माहितीनुसार, अॅड. कांबळे यांचा मृतदेह सोलापूर येथील पांडुरंग वस्ती येथील एका घरात आढळून आला. हे घर गेले काही दिवस बंद होते. तसेच, या घरातून प्रचंड प्रमाणात दुर्गंधी येत होती. पोलिसांना या दुर्गंधीबाबत माहिती मिळाली. पोलिसांनी संबंधीत घरी जाऊन चौकशी केली असता त्यांना अॅड. राजेश कांबळे यांचा मृतदेह आढळून आला. धक्कादायक असे की, कांबळे यांच्या मृतदेहाचे तुकडे करण्या आले होते. तसेच, हे तुकडे एका पोत्यात भरुन ठेवण्यात आले होते.
अॅड. राजेश कांबळे हे अजातशत्रू व्यक्तिमत्व होते. त्यांचे कोणाशी भांडण नव्हते. मात्र, अशा या अॅड. कांबळे यांच्या व्यक्तिमत्वाचे एक वैशिष्ट्य होते. ते म्हणजे अॅड. कांबळे यांच्या अंगावर सतत सात ते आठ तोळे सोने असायचे. त्यामुळे पैसे किंवा चोरिच्या उद्देशाने ही हत्या केली असावी असा प्राथमिक अंदाज आहे. (हेही वाचा, प्रियकराची हत्या करुन बनविली बिर्याणी, लोकांनी खाल्ली!)
दरम्यान, अॅड. कांबळे यांच्या कुटुंबीयांनी सापडलेल्या मृतदेहाचे तुकडे हे अॅड. कांबळे यांचेच असल्याचे पोलिसांना सांगितले. पोलिसांनी घटनेची नोंद घेऊन तपास सुरु केला आहे. दरम्यान, असेही सांगितले जात आहे की, गेल्या काही दिवसांपूर्वी अॅड. कांबळे यांनी खरटमल नावाच्या व्यक्तीकडून लवकरच आपल्याला एक मोठी केस (खटला) मिळणार असल्याचे कुटुंबीयांना सांगितले होते. कुटुंबियांनी दिलेल्या माहितीवरुनही पोलिसांनी तपास सुरु केला आहे.