संपत्तीच्या वादातून धाकट्या भावाने त्याच्या थोरल्या भावाची हत्या केल्याची घटना उघडकीस आली आहे. ही धक्कादायक घटना बीड (Beed) जिल्ह्यातील माजलगाव (Majalgaon) तालुक्यातील पात्रुड (Patrud) येथे घडली आहे. या घटनेनंतर संपूर्ण परिसरात एकच खळबळ माजली आहे. याप्रकरणी आरोपीला पोलिसांनी अटक केली असून त्याच्याविरोधात खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ज्यावेळी ही घटना घडली, तेव्हा त्यांचे आई-वडील तिथेच उपस्थित होते. जागेचे भाडे घेण्यावरून हत्या झाल्याची माहिती पोलिसांना मिळाली आहे. याप्रकरणी स्थानिक पोलीस अधिक चौकशी करत आहेत.
शेख इर्शाद शेख शकील असे हत्या झालेल्या थोरल्या भावाचे नाव आहे. तर, शेख हर्षद शेख शकील असे आरोपीचे नाव आहे. या दोघांत गेल्या अनेक दिवसांपासून प्लॉटचे भाडे घेण्यावरून वाद सुरु होता. याच मुद्द्यावरून सोमवारी पुन्हा एकदा दोघांत किरकोळ वाद झाला. याच वादातून शेख हर्षद शेख शकील या छोट्या भावाने शेख इर्शाद शेख शकील याच्यावर धारदार शस्त्राने हल्ला करत हत्या केली. मोठया भावाचा खून केल्यानंतर आरोपी स्वतः पोलीस ठाण्यात हजर झाला आहे. विशेष म्हणजे, सगळे भांडण होत असताना आई आणि वडील समोर त्यांच्या समोरच होते. हे देखील वाचा- नागपूर: हेल्थ केअर कंपनीतील वृद्ध सफाई कर्मचाऱ्याची गळा चिरुन हत्या; आरोपीचा शोध सुरु
पाथरूड मधील या घटनेने भावाच्या नात्याला काळीमा फासला असून पुन्हा एकदा संपत्तीच्या वादातून सख्खा भाऊ भावाचा पक्का वैरी झाला आहे. या घटनेनंतर संपूर्ण परिसरात हळहळ व्यक्त केली जात आहे. यासंदर्भात न्युज 18 लोकमतने वृत्त दिले आहे.