Mumbai Mayor Election 2019: शिवसेना पक्षाकडून मुंबई महापौरपदासाठी किशोरी पेडणेकर यांच्या नावावर शिक्कामोर्तब
Kishori Pednekar (Photo Credits: Facebook)

मुंबई महानगरपालिकेच्या महापौरपदासाठी शिवसेनेकडून किशोरी पेडणेकर यांच्या नावावर शिक्कामोर्तब करण्यात आलं असल्याची अधिकृत घोषणा नुकतीच माध्यमांद्वारे करण्यात आली आहे. तसेच उपमहापौरपदासाठी सुहास वाडकर यांचं नाव पक्षाकडून जाहीर करण्यात आलं आहे.

मावळते महापौर विश्वनाथ महाडेश्वर यांनी ही घोषणा केली असून ते म्हणाले, “शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या आदेशानुसार किशोरी पेडणेकर आणि सुहास वाडकर यांच्या नावाची घोषणा करत आहोत.”

मुंबई महापालिका महापौरपदासाठी खुल्या प्रवर्गासाठी आरक्षण जाहीर करण्यात आलं होतं. तसेच शिवसेनेचे मुंबईतील महापालिकेत 94 असे संख्याबळ असल्याने शिवसेनेतील इच्छुकांची यादी खूप मोठी होती. त्यात वरळीत विधानसभा निवडणुकीदरम्यान विशेष मेहनत घेणाऱ्या किशोरी पेडणेकर, आशिष चेम्बुरकर, समाधान सरवणकर यांची नावे अग्रस्थानी होती तर मिलिंद वैद्य, मंगेश सातमकर, शुभदा गुढेकर यांसारख्या अनुभवी नगरसेवकांची नावे देखील चर्चेत होती.

पक्षातील ही अंतर्गत स्पर्धा लक्षात घेऊन आणि निवड न झालेल्या नगरसेवकांची नाराजी दूर करण्यासाठी शिवसेना नेते अनिल परब हे महापालिकेत दाखल झाले. आणि त्यांच्या उपस्थितीतच किशोरी पेडणेकर यांनी आज महापौरपदासाठी अर्ज दाखल केला.

मुंबई मेट्रोच्या कामामुळे शहरात प्रदुषण होत असल्याच्या कारणास्तव शिवसेनेचे आंदोलन

दरम्यान, भाजप नेते आशिष शेलार यांनी आज सकाळी ट्विटद्वारे जाहीर केलं की भाजप पक्षाकडून महापौरपदासाठी उमेदवार देण्यात येणार नाही. आवश्यक संख्याबळ भाजप पक्षाकडे नसल्यामुळे ते महापौर पदाची ही निवडणूक लढवणार नसल्याचे स्पष्टीकरण त्यांनी दिले.