मुंबई मेट्रोच्या कामामुळे शहरात प्रदुषण होत असल्याच्या कारणास्तव शिवसेनेचे आंदोलन
मेट्रो (Photo Credits: ANI)

आजपासून हिवाळी संसद सुरु झाले असून शिवसेना विरोधी पक्षाच्या बाकावर बसणार आहेत. याच परिस्थितीत सकाळी शिवसेनेने प्रथम अवकाळी पीकांच्या नुकसान भरपाईसाठी संसदेच्या बाहेर आंदोलन केले. त्यानंतर आता पुन्हा मुंबईत सुरु असलेल्या मेट्रोच्या कामामुळे शहरात प्रदुषण होत असल्याच्या कारणास्तव दक्षिण मुंबईत आंदोलन करण्यास सुरुवात केली आहे. शिवसेनेकडून करण्यात आलेले हे आंदोलन एमएमआरडीए आणि काही खासगी बिल्डरच्या विरोधात केले आहे.

दक्षिण मुंबईतील ठाकूरद्वार येथे शिवसेनेने आंदोलन करत मेट्रोचे आणि इमारतीच्या कामांमुळे आवाजासह हवेचे प्रदुषण होत असल्याचे म्हटले आहे. शिवसेनेचे नेते पांडुरंग सकपाळ यांनी अधिक माहिती देत असे म्हटले की, एमएमआरडीए आणि खासगी बिल्डिंगचे बांधकाम या ठिकाणी मोठ्या प्रमाणात सुरु आहे. त्यामुळे गेल्या काही महिन्यांपासून येथील स्थानिक नागरिकांचा याचा मोठा त्रास सहन करावा लागत आहे. रस्त्यावर सुरु असलेल्या विविध कामांमुळे त्याची रुंदी कमी होऊन वाहतूक कोंडी होत आहे. त्यात मेट्रो आणि खासगी इमारतीसाठी येणारी वाहने सुद्धा या ठिकाणहून नीट बाहेर जाऊ शकत नाहीत.(अवकाळी पावसामुळे शेतकऱ्यांच्या पीक नुकसानीच्या मुद्द्यावरुन शिवसेनेचे संसंदेच्या बाहेर आंदोलन)

तसेच शिवसेना नेते रविंद्र निर्लेकर यांनी असे म्हटले की, सरकारने अवजड वाहनांसाठी सकाळच्या वेळेस वाहतूक करण्यास बंदी घातली आहे. या अशा विविध कामांमुळे नागरिकांना त्रास होत आहेच पण त्यांनी ही कामे थांबवण्यास सुद्धा सांगितले. एवढेच नाही तर येथील स्थानिकांना एमरजेन्सी सुविधेसाठी सुद्धा अडचण येत आहे. त्यामुळे या विभागात अवजड वाहनांमुळे होणारी वाहतूक कोंडी आणि प्रदुषण यावर चौकशी करावी अशी मागणी केली जात आहे.