Shivaji University Kolhapur: शिवाजी विद्यापीठ कोल्हापूर ‘NAAC’ मानांकनात ‘ए-प्लस प्लस’, गुणवत्तेत ठरले महाराष्ट्रात अव्वल
Shivaji University Kolhapur | (File Image)

ग्रामिण भागातील विद्यापीठ अशी हेटाळणी करणाऱ्यांच्या तोंडात शिवाजी विद्यापीठ कोल्हापूरने सणसणीत चपराक दिली आहे. शिवाजी विद्यापीठास राष्ट्रीय मूल्यांकन एवं प्रत्यायन परिषद ( National Assessment and Accreditation Council) म्हणजेच नॅक (NAAC) मानांकनात ‘ए-प्लस प्लस’ ( A++) दर्जा मिळाला आहे. नॅकच्या चौथ्या पुनर्मूल्यांकनामध्ये विद्यापीठास हे मानांकन मिळाले आहे. विद्यापीठास हे मानांकन मिळण्यासाठी पहिले कुलगुरू डॉ. आप्पासाहेब पवार यांच्यापासून ते विद्यमान कुलगुरु डी एन शिर्के यांच्यापर्यंत सर्वांचा समावेश आहे. दरम्यान, शिवाजी विद्यापीठास नॅक मानांकन मिळावे यासाठी तत्कालीन कुलगुरु माणिकराव साळुंखे यांनी जोरदार प्रयत्न केले होते. या मानांकनासाठी आवश्यक गोष्टींसाठी करावी लागणारी पायाभरणी साळुंखे यांनीच केली होती. अखेर संख्यात्मक, गुणात्मक निकषांवर विद्यापीठ यशस्वी ठरले.

शिवाजी विद्यापीठास नॅकद्वारे ‘ए-प्लस प्लस’ ( A++) दर्जा मिळाल्याने 100 कोटी रुपयांचे अनुदान मिळण्याचा मार्ग मोकळा झाला आहे. हे अनुदान युजीसी, रूसाकडून दिले जाते. याशिवाय विद्यापीठातील विद्यार्थ्यांनाही ‘ए-प्लस प्लस’ मानांकनाच्या विद्यापीठातील विद्यार्थी म्हणून संशोधनात विशेष प्राधान्य मिळू शकेल. ग्रामिण भागातील विद्यापीठ म्हणून ओळखल्या जाणाऱ्या या विद्यापीठाच्या शिरपेचात एक मानाचा तुरा खोवला गेला आहे. (हेही वाचा, कोल्हापूर: पन्हाळगडावर सापडला शिवकालीन तोफगोळ्यांचा साठा)

शिवाजी विद्यापीठास मानांकनात मिळालेले निकशनिहाय गुण (चार पैकी)

अभ्यासक्रम : 4, अध्ययन-अध्यापन : 3.61,  संशोधन : 3.09,  पायाभूत सुविधा : 3.65,  विद्यार्थी सुविधा : 3.79,  प्रशासन : 2.95,  चांगले उपक्रम : 3.89

शिवाजी विद्यापिठास ‘ए-प्लस प्लस’ मानांकनाचा ई-मेल प्राप्त होताच सर्वांकडून शुभेच्छांचा वर्षाव सुरु झाला. हा मेल मिळताच कुलगुरू डॉ. डी. टी. शिर्के, प्र-कुलगुरू डॉ. पी. एस. पाटील यांनी यांनी शिवाजी विद्यापीठातील मुख्य इमारतीसमोर असलेल्या छत्रपती शिवाजी महाराज यांच्या अश्वरुढ पुतळ्याल हार घालून अभिवादन केले. या वेळी विद्यापीठातील विविध पदाधिकारी, कर्मचारी आणि विद्यार्थी उपस्थित होते.