छत्रपती शिवाजी महाराज यांचा राज्याभिषेकाचा दिवस (6 जून) यंदाच्या वर्षीपासून शिवस्वराज्य दिन (Shiv Swarajya Din) म्हणून साजरा केला जाणार आहे. याच पार्श्वभूमीवर आता यावर्षीपासून राज्यात सर्वत्र ग्रामपंचायतींवर स्वराज्य गुढी (Swarajya Gudi) उभारली जाणार आहे. ही गुढी यापूर्वी केवळ पुणे जिल्हा परिषदेवर उभारली जात असे पण आता ग्रामविकास खात्याने यामध्ये बदल करत राज्यातील सार्या जिल्हा परिषदा, पंचायत समित्या आणि ग्रामपंचायतीच्या मुख्यालयासमोर 'शिवशक राजदंड स्वराज्य गुढी' उभारली जाणार आहे.
दरम्यान शासन आदेशानुसार, 6 जूनला शिव स्वराज्य दिनी सकाळी 9 वाजता ही गुढी उभारली जाणार आहे. यामध्ये 5 शुभ चिन्हांचा ध्वज समाविष्ट असणार आहे. या शुभचिन्हांमध्ये छत्रपती शिवाजी महाराजांचा जिरेटोप, सुवर्णहोन, जगदंब तलवार, शिवमुद्रा आणि वाघनखं यांचा समावेश असेल.
ध्वजसंहिता काय सांगते?
- ध्वजासाठी चांगल्या प्रतिचा जरी पताका वापरावा.
- हा ध्वज 6 फूट लांब, 3 फूट रूंद असावा.
- ध्वजावर शिवरायांची पाचही शुभ चिन्हं असावीत.
- गुढी उभारण्यासाठी 15 फूट लांबीचा बांबू वापरावा.
- बांबूला सोनेरी, लाल कापडाने सजवावे.
- सूर्यास्तानंतर गुढी खाली उतरावी.
(नक्की वाचा: Shiv Swarajya Din: शिवराज्याभिषेक दिनानिमित्त शिवस्वराज्यदिन हा हैशटैग ट्रेंड करू या- महाराष्ट्र परिचय केंद्र).
शिवराज्याभिषेक दिनाचं औचित्य साधत प्रत्येक वर्षी राजांच्या शिवनेरी, रायगड गडावर शिवसमर्थक मोठ्या संख्येने उपस्थित राहतात. या दिवशी जल्लोष करतात. मागील वर्षी आणि आता यंदाही कोरोना संकटामुळे या शिव राज्याभिषेक दिनावर बंधनं घालण्यात आली आहे. यावर्षी देखील ग्रामीण भागातील कोरोनास्थिती पाहता मोजक्याच लोकांच्या उपस्थितीमध्ये हा सोहळा पार पडणार आहे.