Constitution Day: संसदेतील संविधान दिनाच्या कार्यक्रमावर शिवसेनेसह इतर विरोधी पक्षांचा बहिष्कार!
Shiv Sena | (Photo Credits-ANI)

सध्या महाराष्ट्रात सत्तासंघर्ष शिगेला पोहचला आहे. आज सर्वत्र मोठ्या उत्साहात संविधान दिवस (Constitution Day) साजरा केला जात आहे. राज्यात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) आणि राष्ट्रवादीचे नेते अजित पवार (Ajit Pawar) यांनी मिळून सत्तास्थापना केली. परंतु, यावर त्यानंतर महाराष्ट्राच्या राजकारणात मोठा भूकंप झाला. आज संसदेतील संविधान दिनाच्या कार्यक्रमात शिवसेना सहभागी होणार नसल्याची माहिती एएनआय वृत्तसंस्थेने दिली आहे. शिवसेनेबरोबरच काही विरोधी पक्षही संविधान दिनानिमित्त आयोजित संसदेतील संयुक्त बैठकीवर बहिष्कार घालणार असल्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. (हेही वाचा - Maharashtra Government Formation Live News Updates: मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या पदांच्या भविष्याचा आज फैसला, सर्वोच्च न्यायालय याचिकेवर देणार महत्त्वाचा निर्णय)

सोमवारी शिवसेनेच्या काही नेत्यांनी काँग्रेसच्या हंगामी अध्यक्षा सोनिया गांधी यांची भेट घेतली होती. यावेळीशिवसेनेच्या खासदारांनी सोनिया गांधी यांना काँग्रेसच्या विरोध प्रदर्शनास पाठिंबा देणार असल्याचे सांगितले. विशेष म्हणजे आज महाराष्ट्रातील राजकारणावर विरोधी पक्षांकडून निदर्शनेही केली जाणार आहे. यात काँग्रेस, डावी आघाडी, राष्ट्रवादी काँग्रेस, टीएमसी, आरजेडी, टीडीपी आणि डीएमके या पक्षांचा समावेश असणार आहे. या सर्व पक्षांकडून भाजप सरकराविरोधात संसदेच्या आवारातील डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्यासमोर संयुक्तरित्या निदर्शने केली जाणार आहेत.

संविधान दिन हा 26 नोव्हेंबर रोजी भारतभर साजरा केला जातो. 29 ऑगस्ट 1947 रोजी डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या नेतृत्वाखाली भारताच्या राज्यघटनेच्या निर्मितीसाठी मसूदा समिती स्थापन झाली. अनेक बैठका व चर्चासत्रांनंतर या समितीने सादर केलेला अंतिम मसुदा 26 नोव्हेंबर 1949 रोजी संविधान समितीने स्वीकारला होता. तेव्हापासून हा दिवस संविधान दिन म्हणून साजरा करण्यात येतो. भारताची राज्यघटना 26 नोव्हेंबरला तयार झाली असली तरी ही घटना 26 जानेवारी 1950 रोजी भारतीय जनतेला अर्पण का करण्यात आली.