BMC Election 2022: कोणी कितीही प्रयत्न करा, मुंबई महानगरपालिकेत पुन्हा शिवसेनाच येणार- संजय राऊत
File Image Of Sanjay Raut | (Photo Credits: ANI)

महाराष्ट्रात (Maharashtra) पुन्हा एकदा कोरोनाच्या (Coronavirus) संकटाने डोके वर काढले असताना राज्यातील राजकारणाने पेट घेतला आहे. मुंबई महानगरपालिकेत (Brihanmumbai Municipal Corporation) गेल्या 25-30 वर्षापासून शिवसेनेची (Shiv Sena) सत्ता आहे. कोणीही कितीही प्रयत्न केले तरी, आगामी मुंबई महानगरपालिकेच्या निवडणुकीत शिवसेनेचाच झेंडा फडकणार असल्याचा दावा, शिवसेना खासदार संजय राऊत (Sanjay Raut) यांनी केला आहे. तसेच राज्यातील कोरोना परिस्थितीवरून महाविकास आघाडी सरकारवर टीका करणाऱ्या भाजपवरही त्यांनी प्रत्युत्तर दिले आहे.

संजय राऊत यांनी मुंबई येथे पत्रकारांशी संवाद साधला आहे. दरम्यान, जळगाव महापालिकेतील भाजपच्या पराभवाच्या पार्श्वभूमीवर राऊत यांना मुंबई महापालिकेतील आगामी निवडणुकीबद्दल विचारणा करण्यात आली होती. यावर ते म्हणाले की, मुंबई महापालिकेत गेल्या 25-30 वर्षांपासून परफेक्ट कार्यक्रम सुरु आहे आणि यापुढेही सुरु राहणार. कोणी कितीही प्रयत्न केले तरी, आमचा कार्यक्रम होणारच. मुंबईवर भगवा फडकत आहे आणि यापुढेही फडकत राहणार, असे संजय राऊत म्हणाले आहेत. हे देखील वाचा- भाजप नेत्या Medha Kulkarni यांच्याविरोधात कोथरूड पोलीस ठाण्यात तक्रार; महिलेला मारहाण केल्याचा आरोप

दरम्यान, संजय राऊत यांनी कोव्हिड19च्या मुद्यावरून केंद्र सरकारवर निशाणा साधला आहे. "कोरोनाची साथ आणि लसीकरणाच्या मुद्यावरून महाराष्ट्रातील सरकारला कोंडीत पकडण्याचा प्रयत्न सुरु आहे. एकीकडे राज्यात कोरोना वाढतोय म्हणून बोंब मारत आहेत. तर, दुसरीकडे केंद्र सरकारकडून राज्य सरकारला कुठलेही सहकार्य केले जात नाही. महाराष्ट्रात निवडणुका नाहीत, म्हणूनच हे सगळे सुरू आहे", असाही आरोप राऊत यांनी केला आहे.