ऊसाचे गुऱ्हाळ चालवणाऱ्या महिलेला मारहाण केल्याप्रकरणी भाजपच्या माजी आमदार मेधा कुलकर्णी (Medha Kulkarni) यांच्याविरोधात कोथरूड पोलीस ठाण्यात (Kothrud Police Station) तक्रार देण्यात आली आहे. तसेच त्यांच्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात यावा, अशीही मागणी राष्ट्रवादी काँग्रेसच्या वतीने केली जात आहे. फिर्यादी महिलेचे कोथरूड भागातील रामबाग कॉलनीतील गणेश कुंज सोसायटी समोर ऊसाचे गुऱ्हाळ आहे. परंतु, या ऊसाच्या गुऱ्हाळामुळे त्रास होत असल्याचा दावा सोसायटीतील नागरिकांनी केला आहे. यासंदर्भात मेधा कुलकर्णी यांनी महापालिकेकडे तक्रार केली आहे. मात्र, आता कुलकर्णीं यांच्यावर मारहाणीचा आरोप झाल्याने आश्चर्य व्यक्त केले जात आहे.
गुऱ्हाळामुळे डास आणि माशा वाढल्या असून सोसायटीतील काहींना डेंग्यूची लागण झाली आहे, असा दावा गणेश कुंज सोसायटीमध्ये राहणाऱ्या नागरिकांनी केला आहे. यामुळे सोसायटीतील नागरिकांनी मेधा कुलकर्णी यांच्यासह हे गुऱ्हाळ हटवण्याचा प्रयत्न केला. दरम्यान, हे गुऱ्हाळ चालवणाऱ्या महिलेसह तिच्या पतीशी त्यांची झटापट झाली. यावेळी गणेश कुंज सोसायटीत राहणाऱ्या व्यक्तींसोबत मेधा कुलकर्णी यांनी मारहाण केल्याची तक्रार संबंधित महिलेने कोथरूड पोलीस ठाण्यात दिली आहे. तसेच तक्रारदार महिला आणि राष्ट्रवादी महिला कॉंग्रेसच्या वतीने मेधा कुलकर्णी यांच्यावर गुन्हा दाखल करण्याची मागणी करण्यात येत आहे. हे देखील वाचा- पुणे: भाजपच्या माजी आमदार मेधा कुलकर्णी यांच्यावर दारुड्यांचा हल्ला; कोथरूड पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल
यापूर्वी, भाजपच्या माजी आमदार मेधा कुलकर्णी यांच्यावर दारुड्यांनी हल्ला केल्याची घटना घडली उघडकीस आली होती. या प्रकरणी कोथरूड पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता. सहजानंद सोसायटीच्या प्रवेशद्वाराजवळ दारू पित बसलेल्या टोळक्याला हटकल्याने हा वाद झाला होता. त्यावेळी मेधा कुलकर्णी यांच्या हाताला किरकोळ जखम झाली होती.