
राज्यात सत्ता स्थापनेचा तिढा सुटला नाही. मात्र अवकाळी पावसामुळे शेतकऱ्यांच्या पीकांचे नुकसान झाल्याने आज शिवसेना प्रमुख उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) शेतकऱ्यांच्या बांध्यावर जाणार आहेत. तर शिवसेना आणी राष्ट्रवादी महाशिवआघाडी राज्यात सत्ता स्थापन करण्याच्या प्रयत्नात असताना उद्धव ठाकरे यांच्या सातारा-सांगली दौऱ्याची चर्चा सुरु झाली आहे. उद्धव ठाकरे कडेगाव. खानापूर आटपाडी या विभागातील पिकांच्या नुकसानीची पहाणी करणार आहेत.
राज्यात झालेल्या अवकाळी पावसामुळे शेतकऱ्यांच्या पिकांचे मोठे नुकसान झाले आहे. त्यामुळेच उद्धव ठाकरे आज शेतकऱ्यांच्या बांध्यावर जाणार आहेत. प्रथम उद्धव ठाकरे कराड येथून दौऱ्याची सुरुवात करणार असून कडेगाव मधील पलूस मधील आलं या पीकाचे नुकसान किती झाले आहे ते पहाणार आहे. त्यानंतर नेवरी येथे सोयाबीन आणि मुगाच्या पिकांची नुकसान पहाणी करणार आहेत. सांगली मधील विटा आणि सातारा मधील मायणी येथे द्राक्ष पिकांच्या नुकसानीची पहाणी करणार आहेत.
तर गुरुवार पासून राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार सुद्धा नुकसानग्रस्त भागाची पहाणी करण्यासाठी 2 दिवस विदर्भ दौऱ्यावर आले आहेत. या दरम्यान शेतकऱ्यांच्या समस्या आणि पिकांच्या नुकसानीची पहाणी केली आहे. त्यानुसार प्रशासनाच्या वतीने नुकसानीचे पंचनामे करण्याचे काम सुरु करण्यात आले आहे.(महाराष्ट्रात ओला दुष्काळ जाहीर करण्यासाठी मुंबई मध्ये शेतकर्यांचा एल्गार)
यापूर्वी 1 नोव्हेंबरला शेतकऱ्यांनी शरद पवार यांना परतीच्या पावसामुळे झालेल्या नुकसानाची व्यथा सांगितली. तसेच अद्याप सरकारने शेतकऱ्यांना कोणतीही मदत जाहीर केली नसल्याने नाराजीही व्यक्त केली. सरकारने बागायती आणि जिरायती असा भेदभाव न करता नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना मदत करावी, असं पवार यांनी प्रशासकीय अधिकाऱ्यांना सांगितले.