
मुंबईत (Mumbai) 5 जुलै 2025 रोजी एक ऐतिहासिक क्षण अनुभवायला मिळाला, आज शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) आणि महाराष्ट्र नवनिर्माण सेना (MNS) यांचे नेते, उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे, तब्बल 20 वर्षांनंतर एका व्यासपीठावर एकत्र आले. राष्ट्रीय शैक्षणिक धोरणांतर्गत (NEP) पहिली ते पाचवीच्या वर्गात हिंदी भाषा सक्तीची करण्याच्या महाराष्ट्र सरकारच्या निर्णयाविरोधात, या दोन्ही पक्षांनी तीव्र आंदोलन केल्यानंतर सरकारला आपला निर्णय मागे घ्यावा लागला. या विजयाचा उत्सव साजरा करण्यासाठी वरळीच्या एनएसकीआय डोम येथे ‘मराठ्यांचा आवाज’ या नावाने भव्य रॅली आयोजित करण्यात आली. या रॅलीत मराठी अस्मितेचा जागर करताना ठाकरे बंधूंनी एकजुटीचे प्रदर्शन केले, ज्यामुळे आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांपूर्वी राजकीय समीकरणे बदलण्याची शक्यता निर्माण झाली आहे.
महाराष्ट्र सरकारने 16 एप्रिल 2025 रोजी एक शासकीय आदेश (GR) जारी केला होता, ज्यामुळे मराठी आणि इंग्रजी माध्यमांच्या शाळांमध्ये पहिली ते पाचवीच्या वर्गात हिंदी भाषा तिसरी भाषा म्हणून सक्तीची करण्यात येणार होती. या निर्णयाला शिवसेना (UBT), मनसे आणि महाविकास आघाडीतील इतर पक्षांनी तीव्र विरोध केला. त्यांनी याला मराठी भाषा आणि महाराष्ट्रीयन अस्मितेवर आघात मानला. 29 जून 2025 रोजी, विरोधाच्या तीव्र दबावामुळे, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दोन शासकीय आदेश मागे घेतले आणि त्रिभाषा धोरणाचा पुनर्विचार करण्यासाठी शिक्षणतज्ज्ञ डॉ. नरेंद्र जाधव यांच्या नेतृत्वाखाली एक समिती स्थापन करण्याची घोषणा केली.
Shiv Sena UBT-MNS Mumbai Rally:
Raj Thackeray, Uddhav Thackeray : ठाकरे बंधू एकमेकांना भेटले तो क्षण, आख्खा महाराष्ट्र स्तब्ध! #VijayiMelava #RajThackeray #UddhavThackeray #ThackerayBrothers #ShivSena #MNS #ShivSenaUBT #MaharashtraPolitics #माझीमराठी pic.twitter.com/5kqJaaZquo
— ABP माझा (@abpmajhatv) July 5, 2025
या विजयाचा उत्सव साजरा करण्यासाठी शिवसेना (UBT) आणि मनसेने 5 जुलै रोजी वरळी येथे रॅलीचे आयोजन केले. 5 जुलै 2025 रोजी सकाळी 10 वाजता सुरू झालेल्या या रॅलीत हजारो मराठी भाषिक, साहित्यिक, कवी, शिक्षक, संपादक आणि कलाकार सहभागी झाले. वरळीच्या एनएसकीआय डोमची क्षमता 8,000 असूनही, प्रत्यक्ष उपस्थिती यापेक्षा कितीतरी जास्त होती. रॅलीच्या ठिकाणी बाहेर एलइडी स्क्रीन्स लावण्यात आल्या होत्या, ज्यामुळे जास्तीत जास्त लोकांना हा सोहळा पाहता यावा. उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे यांनी रॅलीपूर्वी दादर येथील बाळासाहेब ठाकरे स्मृतीस्थळाला भेट देऊन अभिवादन केले. रॅलीच्या सुरुवातीला ‘जय जय महाराष्ट्र माझा’ या गीताचे सादरीकरण झाले. रॅलीत शिवसेना (UBT) नेते संजय राऊत, आदित्य ठाकरे, किशोरी पेडणेकर, आणि मनसे नेते बाळा नांदगावकर यांच्यासह राष्ट्रवादी काँग्रेस (शरद पवार गट) च्या खासदार सुप्रिया सुळे आणि आमदार जितेंद्र आव्हाड यांनीही हजेरी लावली. रॅलीत पक्षांचे झेंडे किंवा चिन्हे वापरण्यात आली नाहीत, तर फक्त महाराष्ट्राचा नकाशा आणि ‘मराठ्यांचा आवाज’ ही थीम वापरण्यात आली.
(हेही वाचा: Rajendra Mulak Returns to Congress: माजी मंत्री राजेंद्र मूळक यांच्यावरील निलंबनाची कारवाई मागे)
रॅलीत उद्धव ठाकरे यांनी सांगितले की, ‘आम्ही एकत्र आलो आहोत आणि एकत्र राहू.’ राज ठाकरे यांनीही याला दुजोरा देताना म्हणाले, ‘हा ऐतिहासिक दिवस आहे. बाळासाहेब ठाकरे यांना जे जमले नाही, ते देवेंद्र फडणवीस यांनी करून दाखवले, आम्हाला एकत्र आणले. त्यांनी हिंदी किंवा कोणत्याही भाषेविरुद्ध आपला विरोध नसल्याचे स्पष्ट केले, परंतु मराठी भाषेच्या सन्मानासाठी आणि तिच्या संवर्धनासाठी हा लढा असल्याचे नमूद केले. या रॅलीमुळे ठाकरे बंधूंची 20 वर्षांनंतरची एकजूट राजकीयदृष्ट्या महत्त्वाची मानली जात आहे. मुंबई, ठाणे आणि नाशिकसारख्या मराठी-प्रधान भागात याचा परिणाम स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांवर होऊ शकतो.