Congress, Shiv Sena,NCP | (Photo Credit: Archived, edited, representative images)

महाराष्ट्रात विधानसभा निवडणूकीचा (Assembly Elections) निकाल लागल्यानंतर ते आतापर्यंत राज्यात सत्ता स्थापन झालेली नाही. तर सध्या राज्यात विधानसभेचा कार्यकाळ संपल्यानंतर पक्षांना सत्ता स्थापनासाठी वेळ ही दिला होता. मात्र अखेर राष्ट्रपती राजवट लागू झाली. परंतु गेल्या काही दिवसांपासून शिवसेना (Shiv Sena) आणि राष्ट्रवादी (NCP)-काँग्रेस (Congress) आघाडी पक्षांच्या नेत्यांच्या बैठका पार पडत आहेत. तसेच राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार यांनी दोन-तीन वेळा काँग्रेस अध्यक्षा सोनिया गांधी यांची भेट घेतली असल्याचे दिसून आले. पण आज शिवसेना, राष्ट्रवादी-काँग्रेस आघाडी सत्ता स्थापनेचा दावा करणार असल्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. यामुळे राज्यातील सत्तेची कोंडी फुटेल अशी अपेक्षा आहे.

गुरुवारी शिवसेना प्रमुख उद्धव ठाकरे, आदित्य ठाकरे आणि शरद पवार यांच्यासह पक्षाच्या नेत्यांमध्ये सिल्वर ओक येथे बैठक पार पडली. ही बैठक जवळजवळ 1 तासापेक्षा अधिक काळ झाल्यानंतर यामधून सत्ता स्थापनेबाबत काही संकेत सुद्धा दिले. त्यामुळे आज शिवसेना, राष्ट्रवादी-काँग्रेस आघाडी सत्ता स्थापन करु शकतात. तसेच सत्ता स्थापनापूर्वी घटपक्षांसोबत 12 वाजता बैठक होणार आहे. धननंजय मुंडे यांच्या घरी सत्ता स्थापनेबाबत खलबतं होणार असल्याची फार शक्यता आहे.(शिवसेना पक्षासोबत सरकार स्थापन करणे म्हणजे काँग्रेसला जमिनीत गाडून घेण्यासारखे- संजय निरुपम)

दुसऱ्या बाजूला काँग्रेस पक्षाची सुद्धा बैठक पार पडणार आहे. तसेच काँग्रेस पक्षाचा विधिमंडळ गटनेता सुद्धा निवडला जाणार आहे. तर मुख्यमंत्री पदासाठी उद्धव ठाकरे यांचे नाव आघाडीवर असल्याची जोरदार चर्चा सुरु आहे. एवढेच नाही तर शिवसेनेला 27 महामंडळे आणि काँग्रेस-राष्ट्रवादी आघाडीला 25 महामंडळे मिळणार आहेत. त्यामुळे आता कोणचा मुख्यमंत्री होणार याकडे आता सर्व जनतेचे लक्ष लागून राहिले आहे.