Shiv Sena MLA Sanjay Gaikwad | (Photo Credits: Facebook)

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (CM Uddhav Thackeray) यांच्याबाबत केलेल्या वक्तव्यावरुन पोलिसांनी जर केंद्रीय मंत्री नारायण राणे (Narayan Rane) यांच्यावर कारवाई केली नाही तर आम्ही कारवाई करु, असा इशारा शिवसेना (Shiv Sena) आमदार संजय गायकवाड (Sanjay Gaikwad) यांनी दिला आहे. 'नारायण राणे यांचे वक्तव्य बेतालपणाचे नव्हे तर मस्तवालपणाचे आहे. केंद्रीय मंत्रीपद मिळून एक महिना काय झाला तोवर सत्ता डोक्यात गेली आहे. यापुढे जर अशी विधाने केली तर घरात घुसून हिशोब चुकता करु' असा इशाराही संजय गायकवाड यांनी नारायण राणे यांना दिला आहे.

'अनेक पक्ष बदलून हा कोंबडीचोर या शेतातून त्या शेतात जातो. एक एक शेत खाऊन बेडूग दुसऱ्या शेतात उडी मारतो' असा टोलाही संजय गायकवाड यांनी लगावला आहे. नारायण राणे यांच्या वक्तव्यामुळे जोरदार पडसाद उमटत आहेत. प्रामुख्याने शिवसेनेतून तीव्र प्रतिक्रिया येताना दिसत आहेत. युवा सेनेच्या शिवसैनिकांनी नारायण राणे यांच्या जुहू येथील बंगल्याबाहेर गर्दी केल्याचे वृत्त प्रसारमाध्यमांनी दिले आहे. (हेही वाचा, Narayan Rane Controversial Statement: नारायण राणे यांच्या अटकेची शक्यता; नाशिक पोलिसांचे पथक चिपळूनकडे रवाना)

दरम्यान, नारायण राणे यांच्या वक्तव्यानंतर पहिल्यांदा नाशिक येथे गुन्हा दाखल झाला. त्यानंतर नाशिक पोलिसांचे एक पथक चिपळूनकडे रवाना झाले आहे. हे पथक राणे यांना अटक करण्याची शक्यता आहे. ही अटक झाल्यास राज्याच्या राजकारणात वेगवेगळे पडसात उमटलेले पाहयला मिळू शकतात.

नारायण राणे नेमकं काय म्हटले होते?

रायगड येथील महाड येथे नारायण राणे यांची जन आशीर्वाद यात्रा पोहोचली. या यात्रेदरम्यानस सोमवारी (8 ऑगस्ट) बोलताना नारायण राणे यांची जीभ घसरली. नारायण राणे म्हणाले की, ''त्या दिवशी नाही का? किती वर्षे झाली देशाला स्वातंत्र्य मिळून… अरे हीरक महोत्सव काय? मी असतो तर कानाखालीच चढवली असती''.