Shiv Sena MLA Sanjay Gaikwad: शिवसेना आमदार संजय गायकवाड यांचे वक्तव्य म्हणाले “करोनाचे जंतू सापडले असते तर देवेंद्र फडणवीस यांच्या तोंडात कोंबले असते”
Shiv Sena MLA Sanjay Gaikwad | (Photo Credits: Facebook)

शिवसेना खासदार संजय गायकवाड (Shiv Sena MLA Sanjay Gaikwad) यांनी केलेल्या एका वादग्रस्त वक्तव्याची जोरदार चर्चा सुरु झाली आहे. मला जर करोनाचे जंतू सापडले असते तर मी देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांच्या तोडांत कोंबले असते, इतका तिरस्कार निर्माण झाला आहे, असे विधान शिवसेना (Shiv Sena) आमदार संजय गायकवाड (Sanjay Gaikwad) यांनी केले आहे. राज्यातील कोरोना व्हायरस (Coronavirus) संक्रमितांची संख्या वाढते आहे. कोरोना व्हायरस संक्रमितावर उपचार करताना राज्याची आरोग्य यंत्रणा तोकडी पडत आहे. त्यातच कोरोना लसही आवश्यक प्रमाणात उपलब्ध होत नाही. दुसऱ्या बाजूला रेमडेसीवीर औषधांचाही मोठ्या प्रमाणावर तुटवडा आहे. यातून मार्ग काढण्याचा प्रयत्न करत असताना राज्य सरकार केंद्र सरकारकडे मदत मागत आहे. अशा वेळी भारतीय जनता पक्षाचे नेते राज्यातील ठाकरे सरकार अपयशी ठरल्याची टीका करत आहे. यावरुन आता आरोप प्रत्यारोपांची राळ उडवली जात आहे.

भाजप नेत्यांकडून केले जाणारे नीच पातळीवरचे राजकारण महाराष्ट्र उघड्या डोळ्यांनी पाहतो आहे. राज्यातील भाजप नेते देवेंद्र फडणवीस, प्रवीण दरेकर आणि दुसरे ते 'चंपा' नावाचे चंद्रकांत पाटील हे राजकारण करुन राहिले आहेत. कोरोना हा काही राजकीय पक्ष किंवा त्यांचा कार्यकर्ता पाहून येत नाही. त्यामुळे तो काही फक्त शिवसेना, राष्ट्रवादी काँग्रेस आणि काँग्रेसलाच होत नाही. तो प्रत्येक जाती धर्माच्या व्यक्तीला विळखा घालतो. तर मग राजकारण कसले करता. कोरोना इतका घातक आहे की जर माणूसच राहिला नाही तर मतं कोणाकडे मागाल? त्यामुळे मतांसाठीचे हे राजकारण थांबवा आणि लोकांच्या प्रश्नासाठी भांडा, असे आमदार संजय गायकवाड यांनी म्हटले आहे. (हेही वाचा, बोलबच्चन ठाकरे सरकार कोरोना थैमानाचा सामना ट्विटर आणि फेसबुकवरून करतंय; भाजप नेत्याचा हल्लाबोल)

पुढे बोलताना संजय गायकवाड यांनी म्हटले आहे की, राज्यात कोरोनाचा कहर वाढत असताना महाराष्ट्राला मोठ्या प्रमाणावर कोरोना लस आवश्यक आहे. असे असताना केंद्र सरकार योग्य प्रमाणात कोरोना लस उपलब्ध करुन देत नाही. दुसऱ्या बाजूला पाकिसातान, बांग्लादेशला लस देत आहे. पाकिस्तान, बांग्लादेश हे काय महाराष्ट्रापेक्षा महत्त्वाचे आहे का? असा सवालही संजय गायकवाड यांनी विचारला. आधी महाराष्ट्र जगला पाहिजे, नंतर राजकारण आहे. माणसंच मेली तर कोण मतदान करणार आहे तुम्हाला, असेही ते म्हणाले.

दरम्यान, भाजपने हे विसरु नये की, राज्यात भाजपचे 105 आमदार आहेत. या आमदारांना देखील महाराष्ट्रातील जनतेनेच मतदान केले आहे. केंद्र सरकार औषध कंपन्यांना सांगते आहे की महाराष्ट्राला रेमडेसीवीर औषध देऊ नका. नाहीतर तुमचा परवाना रद्द करु. महाराष्ट्राने केंद्राकडे ऑक्सीजनची मागणी केली तरीही ती पूर्ण केली जात नाही. मोदी सरकार आणि देवेंद्र फडणवीस यांना लाज वाटली पाहिजे. राज्यातील मंत्री हे जीव तोडून काम करत असताना यांना राजकारण सूचते आहे. देवेंद्र फडणीस मुख्यमंत्री असते, चंद्रकांत पाटील मंत्री असते तर काय केले असते? सरकार पडत नाही म्हणून आता हे सरकार कसे अपयशी होईल हे भाजपकडून पाहिले जात आहे. परंतू, या खेळात लोक मरतील त्याचे काय? मला जर करोनाचे जंतू सापडले असते तर मी देवेंद्र फडणवीसांच्या तोडांत कोंबले असते, इतका तिरस्कार निर्माण झाला आहे, असेही शिवसाना आमदार संजय गायकवाड यांनी म्हटले.