कोरोना व्हायरस (Coronavirus) लॉकडाऊनच्या पार्श्वभूमीवर स्थलांतरीत मजूरांना स्वगृही परतण्यासाठी मदत करणारा बॉलिवूड अभिनेता सोनू सूद (Sonu Sood) याच्यावर आज सामना अग्रलेखातून शिवसेना खासदास संजय राऊत (Sanjay Raut) यांनी निशाणा साधला आहे. यावर 'महात्मा सोनू' (Mahatma Sonu) असा टोला राऊत यांनी अग्रलेखातून लगावला आहे. स्थलांतरीत मजूरांना मदत केल्यानंतर सोनूचे सर्वच स्तरातून प्रचंड कौतुक होत आहे. यावर भाष्य करताना संजय राऊत म्हणाले, "लॉकडाऊन काळात सोनू सूद हा नवा महात्मा अचानक प्रकट झाला." "इतक्या पटकन आणि सहज कोणाला महात्मा बनवले जाऊ शकते का?" असा सवालही त्यांनी विचारला. विशेष म्हणजे सोनूच्या कार्याबद्दल राज्यपालांनी देखील सूद याला शाब्बासकी दिली. यावरुन असे दिसते की, स्थलांतरीत मजूरांच्या प्रश्नाबद्दल केंद्र आणि राज्य सरकारने काहीही पाऊले उचलली नाहीत, असेही ते म्हणाले.
लॉकडाऊन काळात सोनू सूदला बसेस कुठून उपलब्ध झाल्या? तसंच स्थलांतरीत मजूरांना राज्यात परवानगी देण्यात आली नव्हती. मग मजूर गेले कुठे? असे थेट सवालही राऊत यांनी अग्रलेखातून केले आहे. सोनू सूद लवकरच पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची भेट घेईल आणि मुंबईचा सेलिब्रिटी मॅनेजर होईल, असा टोलाही संजय राऊत यांनी लगावला आहे.
दरम्यान स्थलांतरीत मजूरांना स्वगृही पाठवण्यासाठी आणि त्यांच्या जेवणाची सोय करण्यासंबंधित चर्चा करण्यासाठी काही दिवसांपूर्वी सोनू सूद याने महाराष्ट्राचे राज्यपाल भगत सिंह कोश्यारी यांची राजभवनात भेट घेतली होती. राज्यापालांनी ट्विट करुनही सोनू सूद याच्या कामाचे कौतुक केले होते. तसंच त्याच्या कार्याला पाठिंबाही दर्शवला होता. (स्थलांतरित मजूरांना स्वगृही पाठवण्यासाठी केलेल्या कामाबद्दल राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी सोनू सूद याचे केले अभिनंदन)
बॉलिवूड अभिनेता सोनू सूद आणि त्याची मैत्रिण नीती गोयल यांनी लॉकडाऊन काळात अडकलेल्या मजूरांना घरी पाठवण्यासाठी पुढाकार घेत 'घर भेजो' मोहिम हाती घेतली होती. या 'घर भेजो' मोहिमेअंतर्गत सोनूने देशव्यापी लॉकडाऊनमुळे मुंबईत अडकलेल्या अनेक मजूरांना घरी पाठवण्यासाठी बसेसची सोय करुन दिली. सोनूने आतापर्यंत कर्नाटक, बिहार, झारखंड आणि उत्तर प्रदेश या राज्यांमध्ये मजूरांना परत पाठवले आहे. तसंच त्याने स्थलांतरीत मजूरांना घरी परत पाठवण्यासाठी मदत म्हणून टोल फ्री हेल्पलाईन नंबरही जारी केला होता.