संजय राठोड (Sanjay Rathod) यांच्या राजीनाम्यानंतर राज्याच्या रिक्त झालेल्या वनमंत्री (Forest Minister) पद कोणाच्या हाती जाणार याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. सध्या मुख्यमंत्री वनमंत्री पदाचा कारभार सांभाळत असले तरी त्यासाठी अनेक नावे चर्चेत होती. दरम्यान, एका शिवसेना नगरसेवकाने 'मला वनमंत्री करा' अशी मागणी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (CM Uddhav Thackeray) यांच्याकडे पत्राद्वारे केली आहे. रवी तरटे (Ravi Tarate) असे यांचे नाव असून संजय राठोड यांच्याच मतदारसंघातील दारव्हा नगरपरिषदेत ते नगरसेवक आहेत. (संजय राठोड यांचा राजीनामा राज्यपालांकडून मंजूर; वनमंत्रीपदासाठी 'ही' नावे चर्चेत)
तरटे यांनी पत्रात लिहिले की, "5 वर्षांपासून मी शिवसेनेत निष्ठावंत म्हणून काम केले आहे. समाजकारणासह राजकारण या विषयावर चांगला दांडगा अभ्यास आहे. माझी मंत्रीमंडळात नियुक्ती केल्यास विदर्भाला मंत्रीमंडळात स्थान मिळेल. तसंच संजय राठोड यांच्याच मतदरासंघातील असल्याने त्यांचे मार्गदर्शनही मला लाभेल. इतर पक्षातील नेते या पदासाठी चढाओढ करत असून माझी शिवसैनिक म्हणून या पदावर निवड करावी, अशी मागणी त्यांनी केली आहे. पुढे पत्रात त्यांनी म्हटले की, "माझ्या मागणीचा सहानुभूतीपूर्वक विचार करुन मला विधान परिषदेवर घेऊन वन खात्याचं मंत्रीपद द्यावं." (संजय राठोड यांच्या जागी मला मंत्री करा; हरिभाऊ राठोड यांचं मुख्यमंत्र्यांना पत्र)
दरम्यान, वनमंत्री पदासाठी अनेकजण उत्सुक असून यापूर्वी माजी खासदार हरिभाऊ राठोड यांनी देखील वनमंत्री पद मागणीचे पत्र मुख्यमंत्र्यांना लिहिले होते. त्यांच्या या मागणीला पोहरादेवीचे महंत सुनील महाराजांनी देखील पाठिंबा दर्शवला होता.