Sanjay Rathod (Photo Credits: FB)

पूजा चव्हाण आत्महत्या प्रकरणात (Pooja Chavan Suicide Case) वादाच्या भोवऱ्यात सापडलेले वनमंत्री संजय राठोड (Sanjay Rathod) यांचा राजीमाना राज्यपाल भगतसिंह कोश्यारी (Bhagat Singh Koshyari) यांनी मंजूर केला आहे. 28 फेब्रुवारी रोजी संजय राठोड यांनी आपला राजीनामा मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याकडे सुपूर्त केला होता. दरम्यान, तीन दिवसानंतर राजीनामा मुख्यमंत्र्यांच्या स्वाक्षरीनंतर आज राज्यपालांकडे गेला आणि अखेर संजय राठोड यांच्या राजीनाम्याला मंजूरी मिळाली.

रिक्त झालेल्या वनमंत्रीपदाचा कारभार सध्या मुख्यमंत्री उद्धव ठाकरे सांभाळत आहेत. मात्र लवकरच नवे वनमंत्री राज्याला लाभतील, अशा चर्चा सुरु झाल्या आहेत. वनमंत्रीपदासाठी  नितीन देशमुख, आशिष जयस्वाल ही नावे सध्या चर्चेत आहेत. वनमंत्री पदाची धुरा नेमकी कोणाच्या हाती जाणार हे पाहणे औत्सुक्याचे ठरणार आहे.

संजय राठोड यांचा राजीनामा राज्यपालांकडे जाण्यासाठी तीन दिवसाचा कालावधी लागल्याने भाजपकडून मुख्यमंत्र्यावर जोरदार टीका करण्यात आली. त्यानंतर आज मुख्यमंत्र्यांच्या स्वाक्षरीसह राजीनामा राजभवनात दाखल झाला आणि त्याला राज्यपालांकडूनही मंजूरी मिळाली. (Pooja Chavan Suicide Case: संजय राठोड यांचा राजीनामा मंत्रालयात फ्रेम करायला ठेवला आहे का? भाजपचा खोचक सवाल)

काय आहे पूजा चव्हाण आत्महत्या प्रकरण?

पूजा चव्हाण या 22 वर्षांच्या मुलीचा पुण्यातील राहत्या घरातील गॅलरीतून पडून 7 फेब्रुवारी रोजी मृत्यू झाला. ती मुळची बीड मधील परळी येथील होती. इंग्लिश स्पीकिंगच्या क्लाससाठी पुण्यात आलेल्या पूजाच्या अवघ्या आठवडाभरात मृत्यू झाला. ती टीकटॉक स्टार होती. तिच्या मृत्यूनंतर 12 ऑडिओ क्लिप्स समोर आल्या. त्या क्लिपमधील आवाज संजय राठोड यांचाच असल्याचा दावा भाजपकडून करण्यात येत आहे.

विशेष म्हणजे हे प्रकरण पुढे आल्यानंतर संजय राठोड तब्बल 15 दिवस नॉट रिचेबल होते. त्यानंतर कोरोना नियमांचे उल्लंघन करत पोहरादेवी येथे त्यांनी जोरदार शक्ती प्रदर्शन केले. या सर्वच प्रकारामुळे शिवसेनेवर, राज्य सरकारवर चहुबाजूने टीका होऊ लागली. विरोधक अधिक आक्रमक झाले. संजय राठोडांचा राजीनामा घेतल्याशिवाय अर्थसंकल्पीय अधिवेशन चालू देणार नाही, असा इशाराही भाजपकडून देण्यात आला. त्यानंतर मात्र अधिवेशनाच्या आदल्या दिवशी संजय राठोड यांनी राजीनामा दिला.