राज्याचा सातबारा छत्रपती शिवराय, डॉ. आंबेडकरांच्या नावावर आहे. त्यांचे राज्य तुम्ही गहाण कसे टाकणार? मुख्यमंत्री येतात व जातात. सरकारे बदलत असतात, पण राज्य कायम राहते. त्यामुळे राज्य गहाण टाकण्याची भाषा कुणी करीत असेल तर ते योग्य नाही, अशा शब्दात शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना फटकारले आहे. खा. रामदास आठवले यांच्या रिपाईंच्या ठाणे येथील एका कार्यक्रमात बोलताना मुख्यमंत्री फडणवीस यांनी 'डॉ. आंबेडकरांच्या पुतळ्यासाठी राज्य गहाण ठेवावे लागले तरी, त्यास माझी तयारी आहे', अशा आशयाचे वक्तव्य केले होते. यावरुनच उद्धव ठाकरे यांनी फडणवीस यांच्यावर टीका केली आहे. दरम्यान, राज्य गहाण ठेवून दिलेली मानवंदना डॉ. आंबेडकर व त्यांचे लाखो अनुयायी स्वीकारणार नाहीत, असेही ठाकरे यांनी म्हटले आहे.
शिवसेनेचे मुखपत्र म्हणून ओळळल्या जाणाऱ्या दै. सामनामध्ये लिहिलेल्या लेखात उद्धव ठाकरे यांनी मुख्यमंत्री फडणवीस यांच्या वक्तव्यावरुन टीका केली आहे. सामनातील लेखात ठाकरे यांनी म्हटले आहे की, 'हे राज्य छत्रपती शिवाजी महाराज, शाहू, फुले आणि भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचेच आहे. आजच्या महाराष्ट्राला प्रतिष्ठा या चार स्तंभांमुळेच मिळाली आहे. त्यामुळे आंबेडकरांच्या स्मारकासाठी राज्य गहाण ठेवण्याची वेळ येणार नाही. मुख्यमंत्री फडणवीस यांनी हे लक्षात घेतले पाहिजे. रामदास आठवले यांच्या ठाण्यातील सभेत मुख्यमंत्री जोरात, पण अतिउत्साहाने बोलले. ‘‘डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्यामुळेच हे राज्य पुरोगामी विचारांवर पुढे चालले आहे. त्यामुळे त्यांच्या स्मारकासाठी राज्य गहाण ठेवावे लागले तर त्यासाठी माझी तयारी असेल,’’ असे एक टाळीचे वाक्य मुख्यमंत्र्यांनी या सभेत केले. डॉ. आंबेडकर आज हयात असते तर राज्य गहाण ठेवण्याची भाषा करणाऱ्या राज्यकर्त्यांवर काठीच उगारली असती', असे ठाकरे म्हणतात.
दरम्यान, याच लेखात पुढे, 'या निमित्ताने राज्यकर्त्यांनी कबुली दिली आहे की, राज्य आर्थिकदृष्टय़ा डबघाईला आले आहे व कर्ज काढून सण-उत्सव साजरे केले जात आहेत. सरकारी कर्मचाऱ्यांचे पगार होतील की नाही अशी परिस्थिती आहे. मध्यंतरी वित्त आयोगाने महाराष्ट्राच्या आर्थिक परिस्थितीवर प्रश्नचिन्ह उभे करताच राज्यकर्त्यांची तारांबळ उडाली होती. अर्थात सरकारच्या तिजोरीत ठणठणाट असला तरी ज्याप्रकारे घोषणांचा पाऊस पडतो आहे तो थक्क करणारा आहे. आंबेडकरांच्या स्मारकासाठी वाटल्यास बुलेट ट्रेनचे महागडे प्रकल्प रद्द करू, समृद्धी महामार्गावरील उधळपट्टी थांबवू, असे सांगितले असते तर ते व्यवहारी ठरले असते, पण बुलेट ट्रेन हे मोदींचे स्वप्न आहे. समृद्धी महामार्ग हे फडणवीसांचे स्वप्न आहे. या स्वप्नांना मूर्तस्वरूप देण्यासाठी पैसे आहेत, पण डॉ. आंबेडकरांच्या स्मारकासाठी हे लोक राज्य गहाण ठेवायला निघाले आहेत. तुम्ही गहाण ठेवलेले राज्य सोडवायचे कोणी? या मधल्या काळात इंधनाच्या रोजच्या दरवाढीमुळे एक लाख कोटींचा रोजचा नफा सरकारी तिजोरीत गेलाच आहे. त्यातले पाच-दहा हजार कोटी रुपये केंद्राने छत्रपती शिवराय व डॉ. आंबेडकरांच्या स्मारकांसाठी दिले तर राज्य गहाण टाकण्याची वेळ मुख्यमंत्र्यांवर येणार नाही', असा सल्लाही ठाकरे यांनी दिला आहे.