Eknath Shinde, Manohar Joshi | | (Photo Credit: Archived, edited, representative images)

एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांनी शिवसेनेत (Shiv Sena) बंड केल्यानंतर आता अवघा पक्षच ताब्यात घेण्याचे प्रयत्न सुरु केले आहेत. या प्रयत्नाचा भाग म्हणून त्यांनी पक्षाला समांतर अशी कार्यकारिणी तयार केली आहे. पक्षनेतृत्वाप्रमाने ते समांतर व्यवस्था राबवत आहेत. त्यांनी पदाधिकाऱ्यांच्या नियुक्त्याही सुरु केल्या आहेत. दुसऱ्या बाजूला शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या गोटात असलेल्या अनेक नेत्यांना ते गळाला लावण्याचा प्रयत्न करत आहेत. दरम्यान ते शिवसनेतील जुन्या जाणत्या नेत्यांनाही भेटत आहेत. आज त्यांनी शिवसेना नेते मनोहर जोशी यांची भेट घेतली. ही भेटीत त्यांनी मनोहर जोशी (Manohar Joshi) यांच्यासोबत बुद्धीबळाचा डावही मांडला. त्यामुळे वरवर त्यांनी ही सदिच्छा भेट असल्याचे सांगितले असले तरी, या भेटीमागे आणखी काही कारणं आहेत का? याबातब तर्कवितर्क लढवले जात आहेत.

एकनाथ शिंदे यांनी नुकतीच शिवसेनेचे ज्येष्ठ नेते लिलाधर ढाके यांची भेट घेतली. या भेटीत शिंदे यांनी डहाके यांचा शाल-श्रीफळ देऊन सत्कार केला. त्याच्याही आधी त्यांनी शिवसेना खासदार गजानन किर्तीकर यांची भेट घेतली होती. आता त्यांनी शिवसेना नेते मनोहर जोशी (Eknath Shinde met Manohar Joshi) यांची भेट घेतली. त्यामुळे शिंदे यांनी आता शिवसेनेतील जुन्या नेत्यांना वश करण्याचा प्रयत्न सुरु केला आहे का? असा प्रश्न राजकीय वर्तुळात विचारला जातो आहे. (हेही वाचा, Shiv Sena: खासदार भावना गवळी, प्रतापराव जाधव यांना धक्का; प्रशांत सुर्वे, संजय जाधव यांचा शिवसेना प्रवेश, उद्धव ठाकरे यांनी इनकमिंग वाढवले)

मनोहर जोशी यांनी एकेकाळी दस्तुरखुद्द शिवसेनाप्रुख बाळासाहेब ठाकरे यांच्यासोबत काम केले आहे. शिवसेनेतील आणि सत्तेतील अनेक पदे त्यांनी भूषवली आहेत. ते महाराष्ट्राचे मुख्यमंत्री राहिले आहेत आणि त्यांनी अटलबिहारी वाजपेयी यांच्या कार्यकाळात लोकसभेचे सभापती पदही भूषवले आहे. मात्र, शिवसेनेत उद्धव ठाकरे यांचा वरचष्मा झाल्यावर काही कारणामुळे मनोहर जोशी आणि उद्धव ठाकरे यांच्यात काही कारणावरुन बिनसले आणि ते पक्षप्रमुखांच्या मर्जीतून उतरले. त्यामुळे त्यांना शिवतीर्थावरील दसरा मेळ्याव्यातून व्यासपीठावरुनही खाली उतरावे लागले होते.

मनोहर जोशी हे पाठिमागील काही वर्षांपासून शिवसेनेत अडगळीत पडले होते. ते फारसे सक्रीय दिसले नाहीत. त्यामुळे आता एकनाथ शिंदे यांनी भेट घेतल्यावर जोशींची सक्रीयता वाढणार का? याबाबत उत्सुकता आहे. तसेच, बुद्धीबळाच्या पटावर दोघांनी केलेल्या जाली परस्परांना पूरक ठरणार का? याबाबतही उत्सुकता आहे. याबाबत येणारा काळच काही भाष्य करु शकेन.