Shiv Sena:  खासदार भावना गवळी, प्रतापराव जाधव यांना धक्का; प्रशांत सुर्वे, संजय जाधव यांचा शिवसेना प्रवेश, उद्धव ठाकरे यांनी इनकमिंग वाढवले
Prataprao Jadhav, Sanjay Jadhav, Prashant Surve, | (Photo Credit: Archived, edited, representative images)Bhavana Gawli |

एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांच्या नेतृत्वाखाली शिवसेना आमदारांनी बंड केले. ते बंडच करुन थांबले नाहीत तर त्यांनी भाजपसोबत सत्ताही स्थापन केली. त्यामुळे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे काहीसे बॅकफूटवर गेले. पण, आता उद्धव ठाकरे पुन्हा सक्री झाले असून त्यांनी बंडखोरांना धक्के देण्यास सुरुवात केली आहे. उद्धव ठाकरे यांनी पहिला धक्का शिवसेना खासदार भावना गवळी (Bhavana Gawali) आणि प्रतापराव जाधव (Prataprao Jadhav) यांना दिला आहे. प्रतापराव जाधव यांचे सख्खे धाकले बंधू मेहकरचे माजी नगराध्यक्ष व गटनेता संजय जाधव (Sanjay Jadhav) यांनी आपण शिवसेनेतच असल्याचे म्हटले आहे. तर दुसऱ्या बाजूला कॅप्टन प्रशांत सुर्वे (Captain Prashant Surve) यांनी शिवसेनेत प्रवेश केला आहे. कॅप्टन प्रशांत सुर्वे (Prashant Surve) हे भावना गवळी यांचे पूर्वाश्रमीचे पती आहेत. काही वर्षांपूर्वी दोघांमध्ये घटस्फोट झाला आहे.

कॅप्टनमुळे वाढणार भावना गवळी यांच्या अडचणी

खासदार भावना गवळी (Bhavna Gawli) आणि कॅप्टन प्रशांत सुर्वे यांच्यात 2013 मध्ये घटस्फोट झाला. त्यानंतर सुर्वे यांनी लोकसभा निवडणूक 2014 मध्ये अपक्ष उमेदवारी दाखल केली. त्यांनी ही निवडणूक अपक्ष म्हणूनच लढवली. पण त्यात त्यांचा पराभव झाला. महत्त्वाचे म्हणजे सुर्वे हे मूळचे वाशिम जिल्ह्यातील रहिवासी असल्याने आगामी काळात उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेकडून त्यांना ताकद मिळाल्यास भावना गवळी यांच्यासमोरी आव्हान वाढू शकते. प्रशांत सुर्वे यांच्या रुपात शिवसेनेला एक चांगला चेहरा आणि भावना गवळी यांना आव्हान मिळू शकते. (हेही वाचा, Sushma Andhare Join Shiv Sena: सुषमा अंधारे यांचा पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या उपस्थितीत शिवसेना प्रवेश, पक्षात येताच उपनेतेपदी निवड)

खासदार प्रतापराव जाधव यांचे वर्चस्व संपुष्टात?

खासदार प्रतापराव जाधव हे एकनाथ शिंदे गटात गेले असले तरी त्यांच्या या निर्णयाला घरातूनच पाठिंबा नसल्याचे चित्र आहे. खासदार जाधव यांचे सख्खे लहान बंधू संजय जाधव यांनी आपण उद्धव ठाकरे यांच्यासोबतच असल्याचे म्हटले आहे. उद्वव ठाकरे यांना दिलेल्या वाढदिवसांच्या शुभेच्छांमध्येही त्यांनी शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे असाच उल्लेख केला होता. संजय जाधव यांनी म्हटले आहे की, आजही आपण मूळ शिवसेनेत आणि पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या सोबतच आहोत. दरम्यान, खासदार प्रतापराव जाधव यांच्या बंडखोरीमुळे बुलढाण्यातील शिवसेनेमध्ये दोन गट पडले आहेत. बंडामुळे जिल्ह्यातील खासदार जाधव यांच्या वर्चस्वाला ओहोटी लागल्याचे स्थानिक अभ्यासक सांगतात.

आपण 2014 मध्येच इच्छुक होतो

दरम्यान, शिवसेनेत प्रवेश केल्यानंतर कॅप्टन प्रकाश सुर्वे यांनी म्हटले आहे की, आपण 2014 च्या निवडणुकीतच शिवसेनेच्या तिकीटावर लोकसभा निवडणूक लढविण्यास उत्सुक होतो. परंतू, पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी म्हटले की, सध्याची राजकीय स्थिती पाहता परिस्थिती तशी नाही. त्यामुळे हे शक्य नाही. त्याना मी म्हटलो होतो की, मी अपक्ष लढतो. तेव्हा त्यांनी मला होकार किंवा नकार असा कोणताच पाठिंबा अथवा विरोध दर्शवला नाही. तेव्हा पक्षाकडूनही मला कोणतीही जबाबदारी देण्यात आली नव्हती. आता संधी मिळाल्याने मी शिवसेना पक्षप्रवेश केला असे कॅप्टन प्रकाश सुर्वे यांनी सांगीतले.