आमदारांच्या बंडानंतर बॅकफूटला गेलेली शिवसेना (Shiv Sena) आता सावरु लागली आहे. पक्षप्रमुख उद्धव ठाकरे आपल्या रणनितीप्रमाणे हळूहळू एक पाऊल पुढे टाकत आहेत. त्यामुळे बंडखोरांमुळे रिक्त झालेल्या जागा आता भरल्या जाऊ लागल्या आहेत. विशेष म्हणजे शिवसेनेसोबत वैचारिक मतभेत असलेल्या फुले-शाहू-आंबेडकर चळवळीतील कार्यकर्ते, नेतेही आता शिवसेनेत प्रवेश करु लागले आहेत. याचे उदाहरण म्हणजे सुषमा अंधारे (Sushma Andhare) . फुले-शाहू-आंबेडकर चळवळीतील प्रमुख कार्यकर्त्या, नेत्या अशी ओळख असलेल्या सुषमा अंधारे यांनी आज शिवसेनेत प्रवेश (Sushma Andhare Join Shiv Sena) केला. पक्षप्रमुख उद्धव ठाकरे (Uddhav thackeray) यांच्या उपस्थितीत त्यांनी आपल्या हाती शिवबंधन बांधले. विशेष म्हणजे शिवसेनेत प्रवेश केल्याबरोबतच अंधारे यांना शिवसेना उपनेता हे पद देण्यात आले आहे.
शिवसेनेत पक्षप्रवेश केल्यानंतर सुषमा अंधारे भावूक झाल्याचे पाहायला मिळाले. अंधारे यांचे शिवसेनेमध्ये दणक्यात स्वागत झाले आहे. अडचणीच्या काळात पक्षात येणाऱ्या सुषमा अंधारे यांना उद्धव ठाकरे यांनीही फार काळ वाट पाहायला न लावता जोरदार रिटर्न गिफ्ट दिले आहे. त्यांची निवड पक्षाच्या उपनेते पदी झाली आहे. या पक्षप्रवेशावेळी विधानपरिषद उपसभापती नीलम गोऱ्हे, आदित्य ठाकरे उपस्थित होते. (हेही वाचा, State Cabinet Expansion: राज्य मंत्रिमंडळाचा लवकरच विस्तार केला जाणार, मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंची माहिती)
जुन्या वादावरही पडदा
सुषमा अंधारे यांनी या पूर्वी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात असताना शिवसेनेवर सडकून टीका केली होती. त्यांनी निलम गोऱ्हे यांच्यावरही टीका केली होती. त्यामुळे या टीकात्मक वादाच्या पार्श्वभूमीवरही त्यांनी पडदा टाकला. त्या म्हणाल्या मी पक्षात नवी आहे. पण, माझ्यावर कोणत्याही प्रकारे ईडी, सीबीआय यांचे ओझे नाही. त्यामुळे पक्षकार्यास मी मोकळी आहे. महत्त्वाचे म्हणजे उद्धव ठाकरे यांनी जेव्हा सांगितले की, माझे हिंदूत्त्व हे शेंडी जानव्याचे नाही. तेव्हाच मी ठरवले की, शिवसेनेसोबत काम करायचे. काही लोकांनी म्हटले की, यापूर्वी तूम्ही टीका केली आहे. निलम गोऱ्हे यांच्यावरही टीका केली आहे. पण मी सांगेन की, निलम गोऱ्हे या मला आईसारख्या आहेत. त्यांच्यावर मी टीका केली. पण आता आमचे संवैधानिक शत्रू जर एकच असतील तर मी त्यांचे नेतृत्व स्वीकारण्यास तयार आहे, असे म्हणत त्यांनी जुन्या वादांवरही पडदा टाकला.