पुण्यातील मावळ (Maval) तालुक्यातील शिरगाव ग्रामपंचायत (Shirgao Grampanchayat) येथील सरपंचावर धारधार शस्त्रांनी हल्ला करून त्यांना ठार करण्यात आल्याची घटना समोर आली आहे. प्रविण गोपाळे (Pravin Gopale) असं या मृत सरपंचाच नाव आहे. या निर्घुण हत्येमागील कारण अद्याप अस्पष्ट आहे. दरम्यान जमिनीच्या वादावरून त्यांची हत्या झाल्याचा संशय व्यक्त करण्यात आला आहे. सध्या हल्लेखोराचा तपास पोलिसांकडून सुरू आहे.
पुण्यातील प्रति शिर्डी मंदिरासमोरच हा खून झाला आहे. त्यामुळे मावळ मध्ये खळबळ पसरली आहे. जमिनीच्या काही वादातून ही हत्या झाल्याचा प्राथमिक संशय व्यक्त केला जात आहे. प्रवीण गोपाळे हे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे होते. प्रवीण गोपाळे हे शिरगावचे विद्यमान सरपंच होते. काही दिवसांपूर्वीच निवडून आले होते. मोठ्या मतधिक्याने ते जिंकून आले होते.
रक्ताच्या थारोळ्यात पडलेल्या प्रविण यांना तातडीने रूग्णालयात दाखल केले आहे पण त्यांचा उपचारादरम्यान मृत्यू झाला आहे. ही घटना काल रात्री 1 एप्रिल च्या रात्री 9 ची आहे. प्रविण गोपाळे हे 47 वर्षीय होते. दुचाकीवरून जात असताना त्यांच्यावर हा हल्ला झाला आहे. प्रत्यक्षदर्शींच्या माहितीनुसार, हल्लेखोरांनी पाठलाग करून त्यांच्यावर कोयत्याने वार केले. नंतर मारेकर्यांनी तेथून पळ काढला. पोलिस सीसीटीव्ही द्वारा हल्लेखोरांचा शोध घेण्याचा प्रयत्न करत आहेत.