मंदिर खुलं झाल्यापासून शिर्डीच्या साईबाबा चरणी सोन्या-चांदीसह 32 कोटींचे दान
Shirdi Sai Baba Mandir (Photo Credits: Wikimedia Commons )

शिर्डी साईबाबा मंदिरं (Shirdi Saibaba Temple) हे भक्तांचं मोठं श्रद्धास्थान. कोरोना लॉकडाऊन (Coronavirus Lockdown) काळात अनेक महिने बंद असलेलं मंदिर 16 नोव्हेंबरपासून पुन्हा खुलं करण्यात आलं. त्यानंतर सुमारे 12 लाख 2192 भाविकांनी साईबाबांच्या दर्शनासाठी हजेरी लावली. दरम्यान, मंदिर खुलं झाल्यापासून 71 दिवसांच्या काळात साईचरणी तब्बल 32 कोटी 3 लाख 43 हजार 900 रुपयांचे दान जमा झाले आहे, अशी माहिती शिर्डी संस्थानाकडून देण्यात आली आहे. विशेष म्हणजे 796 ग्रॅम सोने आणि हजार ग्रॅम चांदीचेही दानही प्राप्त झाले आहे. तसंच यात रोख देणगी, मनीऑर्डर, ऑनलाईन देणगी आदींचा समावेश आहे. (Coronavirus Lockdown मुळे शिर्डीच्या साईबाबा ट्रस्टचे दिवसाचे दीड कोटी रुपयांचे नुकसान; 48 दिवसांत मिळाली फक्त 2 कोटी 53 लाखांची देणगी)

साई संस्थानासाठी 6 कोटी 18 लाख 70 हजार 361 रोख देणगी आली असून 50 लाख 71 हजार 979 ची मनीऑर्डर करण्यात आली आहे. तर ॲानलाईन देणगीच्या स्वरुपात 6 कोटी 39 लाख 1 हजार 896 रक्कम प्राप्त झाली आहे. 2 कोटी 62 लाख 28 हजार 326 देणगी डेबिट व क्रेडिट कार्डद्वारे देण्यात आली आहे. 3 कोटी 5 लाख 89 हजार 626 रुपये चेक, डीडीद्वारे मिळाले असून 22 लाख 60 हजार 165 रुपयांचे परकीय चलन प्राप्त झाले आहे. तसंच 13 कोटी 4 लाख 20 हजार 547 ही दक्षिणा पेटीतील रक्कम आहे.

कोविड-19 संकटाच्या पार्श्वभूमीवर मार्च महिन्यात देशव्यापी लॉकडाऊन करण्यात आला. त्यामुळे तब्बल 8 महिने बंद असलेली मंदिरं 16 नोव्हेंबरपासून खुली करण्यात आली. मात्र कोविड-19 संकटाचा धोका टळला नसल्याने विशेष खबरदारी घेत मर्यादित भाविकांच्या उपस्थितीत मंदिरं खुली झाली. (महाराष्ट्र: सलग सुट्ट्या आल्याने कोल्हापूर, शिर्डी, जेजुरी सारख्या देवस्थळांवर भाविकांची अलोट गर्दी)

दरम्यान, राज्यातील कोरोनाचा प्रादुर्भाव नियंत्रणात आला असला तरी धोका पूर्णपणे टळला नसल्याने नियमांचे पालन करणे आवश्यक आहे. सध्या राज्यात एकूण  2,171 कोरोना बाधित रुग्ण असून 19,20,006 जणांनी कोरोनावर मात केली आहे, तर सध्या 43,393 अॅक्टीव्ह रुग्ण असून राज्याचा रिकव्हरी रेट 95.26% इतका झाला आहे.