महाराष्ट्रातील प्रसिद्ध धार्मिक संस्थांनांपैकी एक शिर्डीचं साई संस्थान (Shirdi Sai Sansthan) आहे. देशा-परदेशातून शिर्डी (Shirdi) मध्ये साईबाबांचं (Saibaba) दर्शन घेण्यासाठी मोठ्या प्रमाणात भाविक येतात. त्यामुळे शिर्डीचं मंदिरं सतत भाविकांच्या गर्दीने फुललेलं असतं. पण आता शिर्डीच्या साई मंदिराला CISF नियुक्त केले जाणार आहेत. त्यावरून मात्र ग्रामस्थांनी तीव्र निषेध नोंदवला आहे. मंदिराला CISF नियुक्तीच्या विरोधात आता ग्रामस्थांनी 1 मे पासून बेमुदत बंदाची हाक दिली आहे.
सध्या शिर्डी मध्ये साई मंदिरात त्यांची स्वतःची सुरक्षारक्षकांसह महाराष्ट्र पोलिसांची सुरक्षा आहे. त्याऐवजी आता CISF लावल्यास भाविकांकडे संशयाने पाहिले जाईल. साई मंदिर हे धार्मिक स्थळ आहे आणि श्रद्धेचा इथे कायम आदर व्हावा अशी भूमिका ग्रामस्थांनी घेतली आहे.
1 मे पासून शिर्डी मध्ये बंद पाळला जाणार असला तरीही या काळात साई मंदिर, दर्शन व्यवस्था, साई संस्थानची निवास व्यवस्था, भोजन व्यवस्था सुरु राहाणार आहे. त्यामुळे बंदाचा भाविकांना कोणताही थेट फटका बसणार नाही. काही महिन्यांपूर्वीच पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते मुंबई ते साई नगर शिर्डी अशी वंदे भारत रेल्वे सेवा देखील सुरू करण्यात आली आहे. त्यामुळे थेट रेल्वे सेवा आणि सध्या सुरू असलेला सुट्ट्यांचा काळ यामुळे भाविकांच्या संख्येमध्ये मोठी गर्दी असते. Shirdi Saibaba Temple: शिर्डी साईबाबा संस्थान ट्रस्टने राम मंदिरासाठी देणगी नाकारल्यानंतर हज समितीला दिले 35 कोटी रुपये? Fake Message व्हायरल, जाणून घ्या सत्य .
दोन वर्षांपूर्वी कोरोनामुळे साई मंदिरात फुले, हार आणि नैवेद्य आणण्यास बंदी घालण्यात आली होती. तेव्हापासून ही बंदी आजही कायम आहे. या बंदीमुळे आजूबाजूच्या सुमारे 400 एकर परिसरात फुलांची लागवड करणाऱ्या शिर्डीतील शेकडो फुल व्यापारी आणि शेतकऱ्यांना मोठ्या प्रमाणात नुकसान सहन करावे लागत आहे. आता ही सेवा देखील पुन्हा सुरू करण्यासाठी मागणी होत आहे.