Shimga (Photo Credits: Instagram )

कोरोना व्हायरसच्या (Coronavirus) वाढत्या प्रादुर्भावामुळे राज्यातील अनेक ठिकाणी कडक निर्बंध लादण्यात आले आहे. त्याचबरोबर कोविड-19 (Covid-19) संकटाचे सावट आता सणांवरही दिसू लागले आहे. कोकणावासियांसाठी खास आणि महत्त्वपूर्ण असलेल्या शिमगोत्सवावर कोरोनामुळे काही बंधनं लागू करण्यात आली आहेत. रत्नागिरी (Ratnagiri) जिल्ह्यासाठी होळी (Holi) निमित्त विशेष नियमावली जारी करण्यात आली आहे. दरम्यान, मागील वर्षभरातील सर्व सण कोरोनाच्या सावटामुळे साजरे करण्यात आले होते.

होळी निमित्त मुंबई किंवा इतर ठिकाणांहून चाकरमानी गावाकडे जातात. त्याचबरोबर होळी निमित्त होणारे उत्सव, पालख्या यामुळे कोरोनाचा संसर्ग वाढण्याची दाट शक्यता आहे. त्यामुळे धोका टाळण्यासाठी शिमगोत्सव साधेपणानं साजरा करण्याचे आवाहन जिल्हाधिकारी लक्ष्मीनारायण मिश्रा यांनी केले आहे. तसंच चाकरमान्यांनी शक्यतो गावाकडे येणे टाळावे, असेही सांगण्यात आले आहे.  जाणून घेऊया शिमगा उत्सवासाठी जारी करण्यात आलेले नियम...

# सर्व मंदिर विश्वस्त आणि पालखीधारकांनी कोरोना चाचणी करणे आवश्यक.

# ग्रामदेवतेच्या पालखीला रुपं लावणे किंवा पालखी सजवणे ही कामे मोजक्याच लोकांच्या उपस्थितीत करणे बंधनकारक.

# पालखी भेटीसाठी जातात केवळ 25 ग्रामस्थ आणि मानकऱ्यांची उपस्थिती.

# होळी आणि पालखीची पूजा करताना पेढे, पार, नारळ इत्यादी स्वीकारले जाणार नाही.

# प्रसाद वाटपासही मनाई.

# पालखी नेण्यासाठी प्रत्येक वाडी किंवा भागातील लोकांना स्वतंत्र दिवस नेमून द्यावा. अथवा 3-3 तासांचा कालावधी द्यावा म्हणजे गर्दी होणार नाही.

# पालखी घरोघरी नेण्यास आणि गर्दीमध्ये नाचवण्यास मनाई.

# होळीनिमित्त गावात होणारे खेळ, नमन इत्यादी लोककलेच्या कार्यक्रमांवर बंदी.

# छोट्या-छोट्या होळ्या करुन मोजक्याच लोकांच्या उपस्थितीत सण साजरा करावा.

# प्रथेपुरते खेळ्यांचे उपक्रम 25 ते 50 लोकांच्या उपस्थितीत करावेत.

# धुलिवंदन, रंगपंचमीच्या दिवशी रंग उधळणे टाळावे.

# चाकरमान्यांना शक्यतो न येण्याचे आवाहन करावे.

# होळीकरता मुंबई, पुणे किंवा इतर भागातून येणाऱ्या नागरिकांचे RTPCR चाचणीचे निगेटिव्ह असणे बंधनकारक आहे. तसंच ही चाचणी 72 तासांपूर्वी केलेली असावी.

(हे ही वाचा: काही ठिकाणी पुन्हा लॉकडाऊन लावावा लागेल, एक-दोन दिवसांत निर्णय घेणार- मुख्यमंत्री उद्धव ठाकरे)

गेल्या वर्षीपासून सुरु झालेले कोविड-19 चे संकट अजूनही घोंघावत आहे. राज्यात लसीकरणाला वेग आला असला तरी कोरोना रुग्णांची वाढती संख्या चिंता वाढवत आहे. त्यामुळे कोरोनाचा संसर्ग आटोक्यात आणण्यासाठी प्रशासन सज्ज झाले आहे. नागरिकांनीही नियमांचे पालन करुन सहकार्य करणे आवश्यक आहे.